आर्णी नगरपालिकेत सत्ताधारी व मुख्याधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे विकास कामे खोळंबल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. २० महिन्यांपासून नगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या नगरपालिकेत जनसमस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पत्रकाद्वारे शिवसेनेचे नगरपालिकेतील गटनेते प्रवीण मुनगीनवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांची भूमिका अकार्यक्षम असून मनपूरचा पाण्याचा प्रश्न असो की, रमाई घरकुल योजनेचा प्रश्नाबाबत ठोस भूमिका नाही, मंजूर झालेल्या रस्त्याचे कामे रेंगाळत असल्याने न.प. निधीचे अंदाजपत्रक सादर करून निर्णय घेतला जात नसल्याचाही आरोप प्रवीण मुनगीनवार यांनी केला आहे. अनेक कामाचे टेंडर काढण्यात आले. मात्र, काही कामे अद्याप सुरू करण्यात आले नाही. जे सुरू आहे त्यात गती नसल्याने विलंब होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आर्णी नगरपालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. पहिल्याच निवडणुकीत मंत्री मोघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आर्णीकरांनी पसंती दिली. अध्यक्ष म्हणून अनिल आडे, तर उपनगराध्यक्ष म्हणून आरीजबेग विराजमान झाले. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी विशेष निधीसाठी पाठपुरावाही केला. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे आर्णीच्या समस्या मार्गी लावण्यात त्यांना पुरेसे यश मिळालेले दिसत नाही. एका काँग्रेस नगरसेवकाने मागच्या वेळी न.प.च्या कार्यालयालाच कुलूप ठोकले होते, तर एका काँग्रेसच्या सभापतीने राजीनामा देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या पक्षातील नगरसेवकांमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे दिसून येते. समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा विकासकामावर निश्चितच फरक जाणवतो. आज अनेक कामे न.प.ने घेतली तरी नगरसेवकात पदाधिकाऱ्यात, तसेच शिवसेनेत मनमिटाव असल्याने समस्यांना ‘खो’ मिळत आहे.
न.प.अंतर्गत शिल्लक निधीचा विकास कामांना मंजुरी देत रस्ते, नाल्या व शुद्ध पाणी या आवश्यक असणाऱ्या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. खड्डे पडले असून पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाची साथ सुरू आहे. साथीच्या रोगात भर पडत आहे. त्यामुळे गटबाजीला मूठमाती देत समस्या सोडवण्यासाठी युवक नगरसेवकांनी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. सेनेचे गटनेते प्रवीण मुनगीनवार यांनी समस्या मार्गी लावल्या नाहीत तर आंदोलनाची भूमिका घेऊ, असे मत ‘लोकसत्ता’जवळ बोलताना व्यक्त केले. मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी सर्वसाधारण सभेमध्ये विकासकामांवर निधी मंजूर होतो तसा प्रस्ताव आपल्यासमोर आला नाही, जर असा प्रस्ताव आला तर आपण निश्चित पुढील कार्यवाही करू, असे स्पष्ट केले.
.