मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा हा ८.८ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१३ अखेर सुरू करण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. मोनोरेलची स्थानके सुसज्ज केल्यानंतर आता स्थानकांभोवतीचा परिसर प्रवाशांच्या वापरासाठी सुलभ आणि सज्ज करण्यासाठी सुमारे साडेचौदा कोटी रुपयांचा सॅटिस प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतला आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या २० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे २३०० कोटी रुपये असून त्यापैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा नोव्हेंबरअखेपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याचा ‘एमएमआरडीए’चा मानस आहे. चेंबूर ते वडाळा प्रवासासाठी सध्या प्रवाशांना खड्डय़ांत गेलेले रस्ते आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणाऱ्या बसमधून तब्बल ४० मिनिटे प्रवास करावा लागतो. पण चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६० आहे. त्यामुळे जवळपास नऊ ते दहा बसचे प्रवासी एका मोनोरेलमध्ये सामावले जातील.
मोनोरेलच्या सेवेसाठी ‘एमएमआरडीए’ने नुकतीच चेंबूर, आर. सी. मार्ग, आरसीएफ वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा अशी सात स्थानके सर्व सुविधांनी सज्ज केली आहेत. आता यापुढच्या टप्प्यात मोनोरेलच्या स्थानकांमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी मोनोरेल स्थानकांवर ‘सॅटिस’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १४ कोटी २१ लाख रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. मोनोरेल सुरू व्हायची तर प्रवाशांसाठी स्थानकावर येण्यासाठी आणि तेथे उतरल्यावर बाहेर पडण्यासाठी मोकळी जागा आवश्यक असेल व मोनोरेल स्थानक परिसरात गर्दी, वाहतूक कोंडी होऊ नये या हेतूने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
स्थानकांबाहेरील पदपथांची दुरुस्ती व रूंदीकरण करणे, प्रवाशांची ये-जा शिस्तीत व्हावी यासाठी कठडे-मार्गिका तयार करणे, दिशादर्शक आणि सूचनाफलक लावणे अशी कामे यात करण्यात येणार आहेत. सॅटिस प्रकल्पाचे काम लवकर संपून मोनोरेल स्थानकांभोवतीचा परिसर लवकरात लवकर सुसज्ज व सुशोभित व्हावा यासाठी सर्व सातही स्थानकांच्या सॅटिसचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याऐवजी दोन भाग करून हे काम देण्यात येणार आहे.