डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विकासकामांसाठी होणारी बांधकामे तांत्रिक मान्यतेसाठी रखडतात. बदलणाऱ्या दरांमुळेही बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने स्वतंत्रपणे ई-टेंडिरग प्रक्रिया सुरू केल्याने कामे गतीने होत आहेत, असा दावा कुलसचिव डॉ. धनंजय माने यांनी केला. येत्या काही दिवसांत अल्पसंख्याक मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा कार्यारंभ आदेश दिला जाईल. या वसतिगृहासाठीची निविदा प्रक्रिया ई-टेंडरिंगने केल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठात डिजिटल स्टुडिओ आणि लॉ स्कूलचे बांधकाम रखडले आहे. डिजिटल स्टुडिओसाठी ४ कोटी १६ लाख रुपये मंजूर झाले. मात्र, कंत्राटदारांकडून अडचण निर्माण झाल्याने काम रखडले. मानसशास्त्र व संस्कृत विभागाचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास येईल. पीएच.डी.साठी येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यतेस वेळ लागतो. त्यामुळेही कामे रखडतात. येत्या काही दिवसांत वाळू व पाण्याची व्यवस्थित उपलब्धता झाल्यास बांधकामांना वेग येऊ शकेल.
विद्यापीठ प्रशासनाकडून या वर्षांत वेगवेगळय़ा विकासकामांना मोठय़ा प्रमाणात निधी मिळविण्यास पाठपुरावा केल्याचा दावा डॉ. माने यांनी केला. मराठवाडा एकात्मिक विकास योजनेतून १२ कोटी ७५ लाख मिळणार होते. त्यातील या वर्षांत साडेचार कोटी मिळणे अपेक्षित आहे. पैकी १ कोटी ७५ लाख मिळाले असून, उर्वरित निधी लवकरच मिळेल. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १० कोटी, पंचवार्षिक योजनेतून ४ कोटी ३७ लाख, उपचारात्मक अध्यापनासाठी २ कोटी ७७ लाख, ताराबाई स्त्री अभ्यास केंद्रासाठी ६ लाख, विज्ञान व तंत्रज्ञान पार्कसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी अशा पद्धतीने विविध निधीसाठी पाठपुरावा झाल्याचा दावा डॉ. माने यांनी केला.
अग्रिमाची २० लाख वसुली
विद्यापीठात वेगवेगळय़ा कार्यक्रमांसाठी म्हणून कर्मचाऱ्यांकडे मोठय़ा प्रमाणात रक्कम अग्रीम स्वरूपात देण्यात आली. त्याचे हिशेब वेळेत सादर झाले नव्हते. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अग्रिमाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही २० लाखांची रक्कम वसूल करण्यास प्रशासनाला बरीच कसरत करावी लागली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
विद्यापीठात विविध कामांसाठी नियुक्त एजन्सीजचे ५००पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातील अडीचशे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांत साफसफाई करणाऱ्या एजन्सीचे काम बदलल्याने बराच फरक पडल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. पूर्वी साफसफाईसाठी नेमलेल्या एजन्सीकडून कर्मचाऱ्यांना त्रास होता. वेळेवर पगार मिळत नव्हते. ही स्थिती सुधारल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यापीठ परिसर ७२३ एकरांचा असून, या वर्षी अतिक्रमणाचे एकही प्रकरण झाले नाही. मैदानावर काही ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालण्याचे प्रकार लक्षात आले असून सुरक्षा एजन्सीजना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. सुरक्षा एजन्सी बदलूनही फारसा उपयोग होत नाही. तेच तेच ते सुरक्षा रक्षक नवनव्या गणवेशात दिसतात. त्यामुळे सुरक्षेतील ढिसाळपणा दूर करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.     

Story img Loader