बेलापूर येथे नवी मुंबई पालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे भव्य मुख्यालयाचे काम अर्धवट असताना त्या इमारतीचे उद्घाटन लवकर आटपून घेण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील धुरिणांनी अक्षरश: जीवाचा आटापिटा सुरू केला असल्याचे चित्र आहे. या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा (१२ डिसेंबर) मुहूर्त साधण्यात आला होता, पण तोपर्यंत काम पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने आता पालिकेच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटनाचा बार उडवून देण्याचा बेत आहे.
नवी मुंबई पालिकेची स्थापना १७ डिसेंबर १९९० रोजी झाली. त्यानंतर एक जानेवारी १९९१ पासून पालिकेचा कारभार बेलापूर येथील सिडकोच्या एका इमारतीतील भाडय़ाने जागा घेऊन सुरू झाला. काही वर्षांनी पालिकेने या इमारतीतील चार मजले विकत घेतले. गेली २० वर्षे पालिकेचा कारभार या इमारतीत फर्निचरने तयार केलेल्या केबिनमधून सुरू आहे. अपुऱ्या जागेमुळे शिक्षण, मालमत्ता, एलबीटीसारख्या महत्त्वाच्या विभागांचा कारभार शहराच्या विविध उपनगरामधून चालविला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणि एकोपा नसल्याची टीका केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर श्रीमंत पालिका म्हणून मिरविणाऱ्या पालिकेचे मुख्यालय व्हावे अशी सर्व स्तरातून गेली अनेक वर्षे मागणी केली जात होती. त्यासाठी सिडकोने वाशी सेक्टर १९ येथे दोन इमारती बांधलेला भूखंड दिला होता, पण पालिकेने तो विकला आणि त्यात गडगंज नफा कमविला. त्यानंतर दुसऱ्या जागेची सिडकोकडे मागणी करण्यात आली.
सिडकोने बेलापूर सेक्टर १५ येथे वीस हजार चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. त्यावर सध्या बांधकाम सुरू आहे. हे मुख्यालय यापूर्वीच बांधून झाले असते, पण माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून त्या कामाला काही काळ खो घातला होता. इतकी वर्षे रखडलेले बांधकाम मात्र आता लवकर उरकण्याचा अट्टहास केला जात आहे. त्यासाठी ११०० कामगार दिवसरात्र काम करीत आहेत, पण तरीही हे काम व्यवस्थित पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. खासदार डॉ. संजीव नाईक या कामावर जातीने लक्ष देत असून ते अधूनमधून या कामाची पाहणी करीत आहेत. घाईघाईत केलेले काम हे अपुरे आणि चांगले होत नसल्याचा अनुभव असताना पालिका प्रशासनाच्या मागे हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी ससेमिरा लावला जात आहे. त्यासाठी अगोदर पवार यांच्या वाढदिवसाची डेडलाइन निश्चित करण्यात आली होती, पण पाचव्या मजल्यावरील पालिकेचा आत्मा समजल्या जाणाऱ्या सभागृहाचेच काम अद्याप पूर्ण झाले नाही तर या इमारतीचे उद्घाटन करण्यात काय अर्थ असा एक मतप्रवाह पुढे आल्याने आता पािलकेच्या वर्धापनदिनाचा (१ जानेवारी) मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. तोपर्यंत काम अपुरे राहिल्यास २६ जानेवारीची तारीख राखून ठेवण्यात आली आहे. उद्घाटन कधीही होवो, पण उद्घाटक म्हणून पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या मुख्यालय उद्घाटनाचा बार उडवून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. इमारतीवर उभारण्यात आलेला डोम, सभागृह, फर्निचर, जिन्याच्या रेलिंग, काही ठिकाणच्या टाइल्स अशी महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अधिकाऱ्यांच्या मते २० टक्के काम अपूर्ण आहे. ३३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या कामावर आतापर्यंत दीडशे कोटी रुपये खर्च झाला असून आणखी खर्च वाढण्याची शक्यता आहे.
काम अर्धवट पण उद्घाटनासाठी खटपट
बेलापूर येथे नवी मुंबई पालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे भव्य मुख्यालयाचे काम अर्धवट असताना त्या इमारतीचे उद्घाटन लवकर
First published on: 07-12-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work incomplete but hurry for inauguration