जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अवघ्या भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रतीक ठरलेल्या आग्य््रााच्या ताजमहालाची प्रतिकृती सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त उभारण्याचे काम सुरू असताना काही हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे हे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सिध्देश्वर यात्रेत प्रमुख आकर्षण ठरलेल्या ताज महालाची प्रतिकृती पाहता येणार नसल्याने लाखो यात्रेकरूंसह पर्यटकांचा स्वप्नभंग झाला आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रा येत्या १२ जानेवारीपासून भरत आहे.  ऐतिहासिक परंपरा असलेही ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख पाच यात्रांमध्ये गणली जाते. यात्रेत विविध करमणुकीची दालने खुली असतात. यंदा देशाच्या विविध भागातून २०६ व्यापारी यात्रेत बालगोपाळांना आकर्षित करणाऱ्या विविध करमणुकीच्या साधनांसह खेळणी, खाद्य पदार्थ, गृहोपयोगी साहित्य, प्रसाधने विक्रीची दालने घेऊन आले आहेत. यात मौत का कुँवा, टेरी टोरा, एअर इंडिया, कोलंबस, डॉग शो, पन्नालाल शो, क्रॉस व्हिल, आकाश पाळणे तसेच लोकनाटय़ आदी करमणुकींच्या साधनांबरोबर यंदा प्रथमच आग्य््रााच्या ताज महालाची प्रतिकृती संपूर्ण यात्रेचे आकर्षण ठरले होते.
होम मैदानावर ताजमहालाच्या प्रतिकृतीच्या उभारणी कामासाठी २५० कलावंत गेल्या आठ दिवसांपासून मेहनत घेत होते. त्यासाठी २० मालमोटारी भरून साहित्य आणण्यात आले होते. २५० फूट लांबी, १२० फूट रुंदी व ५५ फूट उंचीच्या या सुंदर कलाकृतीचा खर्च सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक खर्च झाला. रॅम्बो इंटरनॅशनलचे सुनील भाई हे या ताजमहालाची प्रतिकृती साकारण्यासाठी देखरेख करीत होते. हे काम अंमित टप्प्यात आले असताना अचानकपणे या ताज महालाच्या प्रतिकृतीला काही हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला. त्यामुळे यात्रेत वाद निर्माण झाला. गुरूवारी या प्रश्नावर सिध्देश्वर मंदिर विश्वस्त मंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतर अकारण वाद नको म्हणून ताज महालाची प्रतिकृती हलविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दुपारनंतर ही प्रतिकृती होम मैदानावरून हलविण्याच्या कामास सुरूवात झाली. या निर्णयाबद्दल सुनील भाई यांनी खंत व्यक्त केली. सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण तथा वैभव ठरू पाहणाऱ्या ताज महाल प्रतिकृतीला विरोध व्हायचे कसलेच कारण नव्हते. केवळ कोणी तरी तथाकथित हिंदुत्ववादी मंडळींनी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा इशारा द्यायचा आणि त्याला बळी पडत ताज महालाची प्रतिकृती अचानकपणे हलविण्याचा निर्णय घ्यायचा, हे सर्व अनाकलनीय असल्याचे मत सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात आणखी नावीन्यपूर्ण कलाकृती आणण्याचा मनोदय सुनील भाई यांनी बोलून दाखविला होता. विशेषत: जगप्रसिध्द अक्षरधाम मंदिराचा देखावा सिध्देश्वर यात्रेत साकारण्याचा मनोदय रॅम्बो इंटरनॅशनलच्या माध्यमातून बोलून दाखविण्यात आला होता. परंतु त्यांच्या पदरी निराशा आल्याने आपण यापुढे सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेत यायचे की नाही, याबद्दल फेरविचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया रॅम्बो इंटरनॅशनलच्या संचालकांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा