*    एक हजारपेक्षा अधिक वृक्षांची होणार तोड
*    मोठय़ा पुलासह १४ छोटे पूल प्रस्तावित
नाशिक-सिन्नर रस्ता चौपदरीकरणाच्या कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना प्रत्यक्षात काम कधी सुरु होईल, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनाच आपल्या अखत्यारीतील यंत्रणेला विचारणे भाग पडले. नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबतचा आढावा शुक्रवारी पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुढील एक ते दीड महिन्यात उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून या कामास सुरूवात होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी दिलेल्या माहितीवरून या विस्तारीकरणातंर्गत तब्बल १,०८६ झाडे तोडावी लागणार असल्याची बाबही पुढे आली आहे.
नाशिक-सिन्नर रस्त्याच्या कामास मान्यता मिळून सुमारे वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी प्रत्यक्षात या कामाचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. या कामासाठी एजन्सीची नियुक्ती होऊनही हे काम का रखडले आहे, याची विचारणा भुजबळ यांनी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची सद्यस्थिती मांडली. नाशिक-सिन्नर या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी ७७.१२४ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. त्यापैकी ३.४ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. वन जमिनीच्या बदल्यात दुसरीकडील तेवढीच जागा या विभागास द्यावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विस्तारीकरणासाठी १०८६ झाडे तोडणे भाग आहे. ही झाडे काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे या निकषानुसार वृक्षारोपण करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
भू संपादन, झाडे तोडण्याची परवानगी या प्रक्रियेला साधारणत: अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर रस्ता विस्तारीकरणाच्या कामास सुरूवात होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विस्तारीकरणांतर्गत एक मोठा व १४ छोटे पूल उभारले जाणार आहेत. याशिवाय वाहने जाऊ शकतील असे पाच तर पादचाऱ्यांसाठी सहा भुयारी मार्ग करण्यात येणार आहेत.
बैठकीनंतर सप्तश्रृंगी गडावर स्कायवॉक उभारण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. सप्तश्रृंग गडाचा परिसर दऱ्या- खोऱ्यांचा आहे. त्यामुळे या भागात स्कायवॉक उभारताना त्याची उंची कमी राखणे योग्य ठरेल, अशी सूचना भुजबळ यांनी केली. स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना सप्तश्रंगी देवीचे दर्शनही सुलभपणे घेता येईल. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांची उंची कमी ठेवणे महत्वपूर्ण ठरणार आहे. काही वर्षांपासून गडावर दरड कोसळण्याचे प्रकार अधुनमधून घडत आहेत. त्यात काही भाविकांना प्राण गमवावे लागले. दरड कोसळण्याचे प्रकार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकी दरम्यान निफाडच्या शेतकऱ्यांनी आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांची भेट घेऊन द्राक्ष शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. तथापि, या शिष्टमंडळास पालकमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. धरणातील शिल्लक जलसाठय़ाचे जूनपर्यंत नियोजन करण्यात आल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
माहिती कार्यालयाकडून अशीही ‘माहिती’
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याची माहिती देताना जिल्हा माहिती कार्यालयाने विविध विषयांवरील बैठकांसाठी शासकीय विश्रामगृह हे ठिकाण नमूद केले होते. तथापि, बैठकीचा सोपस्कार पालक मंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे भुजबळ फार्म येथेच पार पडला. ओझर येथील दोन भुयारी मार्ग रद्द करणे आणि सायखेडा ते एअरफोर्स कॉर्नपर्यंत उड्डाणपुलाचे काम करणे, सप्तश्रृंगी गडावर स्कायवॉक बाबत सादरीकरण, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता चौपदरीकरणाबाबत सादरीकरण अशा वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली होती. परंतु, त्यातील काही मोजक्या व काही वेगळ्याच विषयावर आढावा बैठक झाली. म्हणजे, माहिती कार्यालयाच्या कार्यक्रमात नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या बैठकीचा समावेश नव्हता. ही बैठक मात्र भुजबळ फार्म येथे पार पडली.