गेल्या तीन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा देणाऱ्या मॅस्को या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या वेतनात रुग्णालय प्रशासनाने वाढ न केल्याच्या निषेधार्थ ‘काम बंद’ चा इशारा सुरक्षा रक्षकांनी मेडिकल प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने या संदर्भात तातडीने पगारवाढीसंदर्भात प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करून या आंदोलनाची सूचना शासनाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुग्णालयात ४ हजारच्या जवळपास कर्मचारी वर्ग आहे. सर्व विभागांना मॅस्को या माजी सैनिकांच्या सुरक्षा यंत्रणेला सुरक्षेची जबाबदारी दिली गेली. मेडिकलमध्ये ४४ सुरक्षा रक्षक आणि एक सुरक्षा अधीक्षक नियुक्त करण्यात आले. नुकतेच येथे निवासी डॉक्टरांना नातेवाईकांकडून मारहाणीच्या घटना घडल्या. निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांना त्रास होऊ लागला. शेवटी मेडिकल प्रशासनाने रुग्णालयात सुरक्षेसाठी ४ बंदुकधारी, १४ अतिरिक्त सुरक्षारक्षक, १ सुरक्षा अधीक्षक वाढवण्याचे लेखी पत्र निवासी डॉक्टरांना दिल्याने मार्डने संप मागे घेतला. मॅस्कोच्या वतीने त्वरित मेडिकलमध्ये ४ बंदुकधारी नियुक्त करण्यात आले. मात्र वेतनवाढ व वेतन न झाल्याने चारपैकी दोन बंदुकधारी काम सोडून परत गेले. वेतन होत नसल्याने १४ अतिरिक्त कर्मचारीही यायला तयार नाहीत.