महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीअंतर्गत जिल्ह्य़ात सुरू असलेल्या विविध कामांची विशेष दक्षता पथकामार्फत तपासणी करण्याचे काम ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्य़ात रोहयोअंतर्गत झालेल्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाले. केलेल्या कामांच्या दामासाठी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला, तर कळमनुरी तालुक्यातील देववाडी येथील नाला बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे यापूर्वी कनिष्ठ अभियंता बी. पी. लहाने, शाखा अभियंता आर. एस. मगरे, अ. शफी अ. रशीद व एस. एस. घोळवे यांना निलंबित करण्यात आले.
बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उद्या (मंगळवारी) या सर्वाविरुद्ध विभागीय चौकशीचे काम सुरू होणार आहे. या सर्व प्रकारांची दखल घेणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचे दुधाने ओठ जळाल्याने ते आता ताकसुद्धा फुंकून पित असल्याचे चित्र रोहयोच्या कामासंदर्भात पाहावयास मिळते. म्हणूनच की काय कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्याच्या हेतूने कामाची तपासणी करणे गरजेचे असल्याचे सूत्रांकडून समजले.
 मग्रारोहयोअंतर्गत जलसंधारण, पाटबंधारे व वनीकरण, रस्ते आदी कामांची गुणवत्ता टिकविण्यासाठी व अनियमितता टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो दक्षता पथकाने १३ ते १५ मार्चदरम्यान कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील कामांची तपासणी केली. आता हे दक्षता पथक उद्यापासून (मंगळवार) ३० मार्चपर्यंत औंढा, सेनगाव, वसमत तालुक्यातील जवळाबाजार, यळेगाव, साळणा, गोरेगाव, आजेगाव, हट्टा, गिरगाव, कुरुंदा, टेंभुर्णी, आंबा, हयातनगर, डोंगरकडा, वारंगाफाटा, वाकोडी, साखरा पानकन्हेरगाव, हत्ता आदी गावांतील कृषी, जलसंधारण, वनीकरण, रोपवाटिका, रस्ते, विहिरी तसेच वन विभागाच्या कामांची तपासणी करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Story img Loader