महापालिका सेवेतील १५९ रोजंदारी बिगारी सेवकांना लवकरात लवकर सेवेत कायम करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात महापालिका आयुक्त महेश पाठक यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अनुपम बेगी म्हणाले,की आरोग्य खाते आणि नगर अभियंता येथील रोजंदारी बिगारी सेवकांची यादी १३९ जणांची आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक न्यायालयातील यादी २० जणांची असून एकूण १५९ रोजंदारी बिगारी या दोन्ही विभागात सेवेत असल्याची माहिती, माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. अन्य संघटनेने महापालिकेमध्ये कधीही सेवा केलेली नाही अशा २९५ रोजंदारी बिगारी सेवकांची बोगस यादी सादर केली आहे. महापालिका आरोग्य खाते आणि नगर अभियंता विभागाने दिलेली १५९ जणांची यादी आणि या संघटनेने सादर केलेली २९५ जणांची यादी यामध्ये तफावत आहे. एवढेच नव्हे तर, एकही नाव या दोन्ही यादीमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे सेवा देणाऱ्या सेवकांना लवकरात लवकर सेवेमध्ये कायम करावे आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.