महापालिका कामगारांच्या ३ महिन्यांचे थकीत वेतन व विविध २८ मागण्यांबाबत आयटक प्रणीत मनपा कामगारांनी सोमवारी बेमुदत संप पुकारला. पूर्ण वेतन मिळाल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा निर्धार संपक ऱ्यांनी केला. संपात किमान ५०० कामगार-कर्मचारी उतरल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, संपाचा अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. पर्यायी यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापौर प्रताप देशमुख यांनी दिले.
गेल्या १५ ऑक्टोबरला परभणी मनपास संपाची नोटीस दिल्यानंतर प्रशासनाने कामगारांचा थकीत पगार अदा करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे कामगारांवर दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्याची वेळ आली आहे. असा आरोप कामगार नेते कॉ. राजन क्षीरसागर यांनी केला. राज्य सरकारकडून अनुदान बंद झाले व स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीबाबतही संदिग्धता आहे. अशा स्थितीत कामगार-क र्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर प्रशासनातील चुकांमुळे कामगारांच्या पदोन्नती, सुट्टय़ा, रजा, किमान वेतन, वैद्यकीय बिले, कपात रकमा, प्रॉव्हिडंट फंड आदी प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आला. संपामध्ये पाणीपुरवठा, सफाई, उद्यान, वीज आदी विभागांतील शेकडो कामगार कर्मचारी सहभागी झाले आहेत. वेतनासाठी सरकारकडून आलेला निधी इतरत्र का वळविला जात आहे, असा सवाल कॉ. क्षीरसागर यांनी केला. पूर्ण वेतन घेतल्याशिवाय कामगार कामावर येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपाचा परिणाम होऊ देणार नाही – महापौर देशमुख
शासकीय अनुदान बंद झाल्यामुळे वेतनाचे प्रश्न निर्माण झाले. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील आहोत. महापालिकेत आम्ही सत्तेवर आल्यानंतर ७ महिन्यांचे वेतन बाकी होते. आता केवळ ३ महिन्यांचे वेतन थकीत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने थकीत वेतन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला कामगार कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. असे आवाहन महापौर प्रताप देशमुख यांनी केले. पाणीपुरवठा, स्वच्छता या बाबींशी संबंधित कामगार कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी व उपाययोजना करीत आहोत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनासंदर्भातली तरतूद जवळपास पूर्ण झाली आहे. १ कोटी ९५ लाख रुपये महापालिकेस प्राप्त होण्याच्या स्थितीत आहेत. त्यानंतर लगेचच दिवाळीच्या आधी वेतनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असेही महापौर देशमुख यांनी स्पष्ट केले.
परभणी मनपा कामगारांचा वेतनप्रश्नी बेमुदत संप सुरू
महापालिका कामगारांच्या ३ महिन्यांचे थकीत वेतन व विविध २८ मागण्यांबाबत आयटक प्रणीत मनपा कामगारांनी सोमवारी बेमुदत संप पुकारला. पूर्ण वेतन मिळाल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा निर्धार संपक ऱ्यांनी केला. संपात किमान ५०० कामगार-कर्मचारी उतरल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.
First published on: 06-11-2012 at 03:59 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker strike in parbhani mahanagarpalika