मुंबई विद्यापीठाच्या मराठी आणि जर्मन विभागातर्फे ‘अन्य भाषकांसाठी ‘मराठी’चे अध्यापन : वर्तमान स्वरूप आणि भवितव्य’ या विषयावर  कालिना येथील विद्यानगरीतील जीवशास्त्र विभागाच्या चर्चासत्र कक्षात २१ व २२ मार्च रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचा प्रारंभ सकाळी साडेदहा वाजता ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्या बीजभाषणाने होणार आहे. पहिल्या सत्रात ‘अन्य भाषकांसाठी ‘मराठी’चे अध्यापन : अनुभवकथन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात पुणे येथील मराठी अभ्यास परिषदेच्या विजया देव व वझे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रकाश परब सहभागी होणार असून परिषदेचे प्र. ना. परांजपे हे अध्यक्षस्थानी असतील.
याच विषयावर होणाऱ्या दुसऱ्या सत्रात अनुक्रमे नीती बडवे, शोभना नाडकर्णी सहभागी होतील. याच विषयावरील तिसऱ्या सत्रात रुईया महाविद्यालयाचे विजय तापस आणि सोमैय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख वीणा सानेकर सहभागी होतील तर चौथ्या सत्रात ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे दीपक पवार, ‘राज्य मराठी विकास संस्थे’चे सुशांत देवळेकर आणि ‘न्यु इंडीकट्रान्स टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड’चे स्वप्नील हजारे आदी सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यशाळेत ‘अन्य भाषकांसाठी मराठी अध्यापन कसे असावे’ याबद्दल प्रकाश परब, पुण्याच्या ‘वेस्टर्न रिजनल लॅंग्वेज सेंटर’च्या कलिका मेहता, जर्मन विभागाच्या गिरिजा गोंधळेकर आणि रूपा पुजारी हे प्रात्यक्षिक सादरीकरण करणार आहेत. तर याचवेळी सुहास लिमये आणि जयवंत चुनेकर हे अमराठी भाषक आणि मराठी अध्यापक यांच्याशी गप्पा मारतील. तर दुसऱ्या सत्रात गटचर्चा आणि कृतिआराखडा तयार करण्यात येणार असून यात दीपक पवार, विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्रमुख विभा सुराणा, वसुंधरा पेंडसे नाईक, प्र. ना. परांजपे, सुहासिनी कीर्तिकर, कलिका मेहता, मिलिंद जोशी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा