येथील लोकहितवादी मित्र मंडळ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यावतीने १७ ते २० जुलै या दरम्यान रंगायन नाटय़ संस्थेच्या विजया मेहता यांची अभिनय व दिग्दर्शन या विषयावर नाटय़कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये प्रथमच नाटय़ दिग्दर्शिका विजया मेहता यांची कार्यशाळा होत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी दिली.
साठीच्या दशकात मराठी रंगभूमीला नवी वाट दाखविणाऱ्या ‘रंगायन’ नाटय़ संस्थेने नाटय़ चळवळीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. रंगायनच्या विजया मेहता यांची  रंगमंचाशी जुळलेली नाळ, त्यांचे कार्य, अनुभव याचा नवोदितांसह नाटय़कर्मीना लाभ व्हावा, यासाठी या मार्गदर्शनपर कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत विजया मेहता व त्यांचे सहकारी तसेच नाशिक शहरातील नाटय़ क्षेत्रातील दिग्गज मंडळीचा सहभाग राहणार आहे. कार्यशाळेपूर्वी इच्छुक रंगकर्मीकडून वैयक्तिक माहिती तसेच अन्य तपशील मागविण्यात आला आहे. मेहता यावर अभ्यास करून इच्छुक प्रशिक्षणार्थीचा कल लक्षात घेणार आहेत. त्यानुसार पाच ते सात विद्यार्थ्यांचे गट करून कार्यशाळेची सुरूवात होईल. विद्यार्थ्यांना आपल्या कलेचा अविष्कार मेहता यांच्यासमोर १७ जुलै रोजी सादर करावयचा आहे. कार्यशाळेचे वैशिष्ठय़ म्हणजे, रंगभूमीची आवड आहे, त्याची विविध अंगे समजून घ्यायचा प्रयत्न आहे, अशा व्यक्तींना ‘निरीक्षक’ म्हणून सहभागी होता येईल. निरीक्षकांचा कार्यशाळेशी थेट संबंध नसला तरी त्या त्या वेळच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असेल. कलावंतांना कसे नियंत्रित ठेवावे, हाताळावे, अभिनयाची विविध अंगे, दिग्दर्शकाची भूमिका आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत नाशिकसह औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार, मुंबई आणि पुणे येथील रंगकर्मी सहभागी होणार आहेत. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी केले. ‘तु तिथे मी’ फेम मृणाल दुसानिस, स्वप्नाच्या पलीकडले फेम चिन्मय उद्गीरकर यांच्यासह मालिकेतील अनेकांनी कार्यशाळेत नावे नोंदवली आहेत. इच्छुक रंगकर्मीनी आपली नावे १ जुलैपर्यंत कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक किंवा लोकहितवादी मंडळ, ज्योती कलश सभागृह, राका कॉलनी, शरणपूर रोड नाशिक येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जयप्रकाश जातेगांवकर (९८२२० ५६९१६), मुकुंद कुलकर्णी (९८९०७ ००१०१), प्रवीण काळोगे (९४२२७ ५२२९४) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा