तीन बहुरुप्यांची जमावाने केलेली हत्या तसेच वसंतराव नाईक झोपडपट्टीतील भुरू प्रकरण वेदनादायी असून नागपुरातील कार्यकाळ अधिक कठीण होता, असे पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय म्हणाले. डॉ. धनविजय येत्या ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत असून त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना व अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. अंकुश धनविजय यांनी ११ ऑगस्ट २०१० रोजी नागपूरला पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. भारतीय पोलीस सेवेच्या १९८२च्या तुकडीचे डॉ. धनविजय यांनी आज त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. नागपूरचा कार्यकाळ अधिक खडतर, कठीण व आव्हानात्मक होता. माध्यमांनी टीकाही केली आणि विविध घटनांमध्ये देशहित व समाजहित विचारात घेऊन सहकार्यही केले. पण तरीही पूर्ण समाधानी आहे. नागपूरकर जनता, लोकप्रतिनिधी आणि सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले, या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
तीन बहुरुप्यांची जमावाने केलेली हत्या तसेच वसंतराव नाईक झोपडपट्टीतील भुरू प्रकरण आदी घडलेल्या घटना वेदनादायी होत्या. वसंतराव नाईक झोपडपट्टीत इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू होता, तरुणाचा खून करून तेथे मृतदेह पुरणे आदी बाबी पोलिसांना कळल्या कशा नाहीत, असा प्रश्न वारंवार सतावतो. मोनिका किरणापुरे हत्या प्रकरण आजवरच्या नोकरीत सर्वात आव्हानात्मक ठरले. रोज मध्यरात्रीपर्यंत उशिरा विविध पथकांकडून आढावा आणि दुसऱ्या दिवशीचे नियोजन केले जात होते. त्यातील मारेकऱ्यांचा छडा लागून ते गजाआडही झाले. याचे श्रेय ‘टीम वर्क’ला आहे, असे डॉ. धनविजय यांनी सांगितले.
मोनिका व कुश कटरिया ही सर्वात अतिसंवेदनशिल प्रकरणे ठरली. दोन निष्पाप जीव नाहक गेले. शाहू तसेच अनंत सोनी खून प्रकरण, दीड कोटींच्या सोन्याची लूट आदी प्रकरणांचा शोध लावू शकलेलो नाही. विजय ठवकर खून प्रकरणात एका आरोपीचा अद्यापही छडा लागलेला नाही, अशी खंत पोलीस आयुक्तांनी बोलून दाखविली. खून, दरोडा आदी गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली असली तरी पंधरा वर्षांच्या तुलनेत घट झालेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना  एका आठवडय़ात सर्व देणी व सहकुटुंब सत्कार आदी योजना डॉ. धनविजय यांनी पुढाकाराने राबविल्या. २८ आरोपींवर मोक्का तर २६ गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई त्यांच्याच कार्यकाळात झाली. दहशतवादी कारवायांचा धोका ओळखून रा. स्व. संघ कार्यालयात त्यांनी चोवीस तास ‘क्यूआरटी’ पथक तैनात केले. बाजारपेठा व इतर अतिसंवेदनशिल ठिकाणी चोवीसतही तास अलर्ट राहण्यासंबंधी पावले उचलली.
गुन्हे वा गुन्हेगारी फोफावू नये, याची स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी अतिगंभीरतेने काळजी घ्यायला हवी. पोलीस ठाण्यांसह पोलिसांच्या सर्वच शाखांनी अधिक मजबुत व सक्षम होण्याची गरज डॉ. धनविजय यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्तीनंतर नोकरी करणार नाही, मात्र सल्लागार म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा