शाळेतली मुलं जेव्हा ‘आम्ही कुठली पुस्तकं वाचावी?’ असं मला विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘तुम्हाला जी वाचावीशी वाटतील, ती वाचा.’ काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करून सांगतात, ‘आम्हांला रहस्यकथा आवडतात.’ मग मी म्हणतो, ‘मग रहस्यकथा वाचा.’ माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव, भालेराव यांच्या गुप्त-पोलिसी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे. माझ्या आयुष्यात ‘पुस्तक’ ही गरज व्हायला या करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो, त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यातून आवडीनिवडी ठरायला लागतात. शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल, त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं, तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट-मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो. कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला, कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला, कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला, सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण केवळ वैयक्तिक आवडिनिवडीचा प्रश्न आहे, म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी, याचाही विचार करायला हवा.
पुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइस्क्रीम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली, तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या या पदार्थाचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यर्थ्यांच्या मनात पुस्तकासंबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पाठय़पुस्तकांसंबंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही; नाही वाचलं तर नापास होऊ या भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक ‘पाठय़पुस्तक आहे’ अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात की, आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का? साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा.
(‘रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका’मधून साभार)
पु. ल. देशपांडे

जीवनातील सर्वात सुंदर कालखंड कोणता असेल तर हाच अभ्यास करण्याचा कालखंड. आयोगाच्या परीक्षांना सामोरे जाऊन यश मिळविण्याचा कालखंड. याहून सुंदर कालखंड जीवनात दुसरा नाही! उत्कृष्ट अन् दर्जेदार संदर्भ ग्रंथ हा सुंदर कालखंड तुमच्या जीवनात यावा, यासाठी तुमच्या विश्वासू मित्राची भूमिका बजावतात!
व्ही. एस. क्षीरसागर (के’सागर)

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात  ई-बुकपासून ऑडिओ बुकपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपांत पुस्तकं आपल्याला उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा सर्व पुस्तकप्रेमींसाठी निश्चितच
भरभराटीचा आणि उत्साहवर्धक असेल. पुस्तक दिनानिमित्ताने या सर्व वाचनप्रेमींना डायमंड
पब्लिकेशन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा!
– दत्तात्रेय गंगाराम पाष्टे
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे</strong>

पुस्तकवाचन म्हणजे ज्ञान मिळवणे, म्हणून सतत वाचा.. अधिकाधिक ज्ञान मिळवा.
– जिग्नेश फुरिया,
निराली प्रकाशन