आजच्या संगणकाच्या काळात वाचकांची अभिरुची बदलत असून वाचन संस्कृती कमी होत असल्याची ओरड होत आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील विविध ग्रंथालयातील गेल्या पाच सहा वर्षांत वाचकांची त्यातही बालवाचकांची वाढती सदस्य संख्या बघितली तर वाचन संस्कृती कमी होत नसून ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात शहरातील काही ग्रंथालय प्रमुखांशी संवाद साधण्यात आला असून त्यांनी याबाबत मत व्यक्त केले.
सीताबर्डीवरील राजाराम वाचनालयाचे कार्यवाह मुकुंद नानीवडेकर म्हणाले, राजाराम वाचनालयात गेल्या काही वर्षांत वाचकांची संख्या वाढत असून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तकाची मागणी केली जात आहे. नवीन मासिक, आत्मचरित्र, अनुवादात्मक पुस्तके बाजारात येत असून त्यांची मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी ४ हजार ६९ वाचक सदस्य संख्या होती. ती यावर्षी १०४ ने वाढली आहे. दररोज २५० ते ३०० पुस्तके वाचक घरी घेऊन जात असतात आणि ती दोन ते तीन दिवसात वाचून नवीन पुस्तके घेऊन जात असतात. नवनवीन पुस्तकांकडे नवीन पिढी आकर्षित होत आहे. सध्या वाचनालयात १ लाख ४०हजारांवर ग्रंथसंपदा आहे. दरवर्षी दोन ते अडीच लाखाची पुस्तके ग्रंथालयात विकत घेतली जातात. स्पर्धात्मक पुस्तकांकडे युवा वर्गाचा कल वाढला आहे. या शिवाय अनुवादात्मक पुस्तके मोठय़ा प्रमाणात वाचली जातात. महिला वर्गाची रेसिपी, धार्मिक पुस्तकांची मागणी असते. कला आणि संस्कृती विषयाची पुस्तके वाचक वाचत असतात. मराठी कथा कांदबरी वाचनाकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. या शिवाय दररोज येणाऱ्या वर्तमानपत्राचे वाचन करणारे वाचक मोठय़ा प्रमाणात असल्याचे नानीवडेकर म्हणाले.
नागपूर शहरात सर्वात जुन्या असलेल्या महालातील राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष पदमश्री तांबेकर म्हणाले, या ग्रंथालयाचा यावर्षी शतकोत्तर महोत्सव साजरा केला आहे. मधल्या काळात ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, गेल्या दहा- बारा वर्षांत पुन्हा या ग्रंथालयाचा विकास करण्यात आला असून वाचकांची सदस्य दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रंथालयामध्ये वाचकांची संख्या वाढत असून युवा वर्ग करिअर संदर्भातील पुस्तकाकडे जास्त आकर्षित होऊ लागला आहे. वाचनालयात बसून वाचन करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ग्रंथालयात सध्या २७ हजारपेक्षा जास्त पुस्तक असून दरवर्षी वाचकांची आवड बघून नवनवीन पुस्तक खरेदी केली जातात. मराठी, हिंदी भाषेची पुस्तके जास्त वाचली जातात. वाचन संस्कृतीसंबंधी विविध उपक्रम राबविले जात असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाचक सदस्य संख्या ४० ते ५०ने वाढली आहे. सध्या ७०० सदस्य संख्या आहेत. लहान मुलांशाठी विविल बाल साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून अनेक लहान मुले अशा पुस्तकाची मागणी करीत असतात. टीव्ही आणि नेटकडे आजचा युवा आकर्षित झाला असला तरी त्याची वाचनाची आवड मात्र कमी झाली नाही. इंग्रजी अनुवादात्मक, ऐतिहासिक पुस्तकाची मागणी वाचकांकडून होत असते असेही तांबेकर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा