सुलेखनाचे शास्त्र, त्यासाठी लागणारी आयुधे, सुलेखनामागील तत्त्वज्ञान आणि विचार या सर्वाचा परामर्श घेणाऱ्या ‘द वर्ल्ड ऑफ कॅलिग्राफी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने अच्युत पालव आणि ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’चे पन्नास विद्यार्थी यांनी एकत्रितपणे लेखन व सुलेखन केले आहे. नवनीत प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक उदयोन्मुख सुलेखनकार आणि चित्रकार यांचे काम प्रकाशात आणण्यासाठी समर्पित करण्यात आले आहे. सुलेखन क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या अच्युत पालव यांनी चार वर्षांपूर्वी ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ ही भारतातील सुलेखनाची पहिली शाळा सुरू केली. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतूनच आपण ही शाळा सुरू केली होती. गेली तीन वर्षे आपण आणि आपले ५० विद्यार्थी या पुस्तकासाठी मेहेनत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याने आपला कलेशी खूप जवळचा संबंध होता. संगणकाच्या उदयापासूनच सुलेखनाचे महत्त्व जास्तच वाढले आहे. अच्युत पालव यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत केलेले हे काम स्तुत्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

Story img Loader