यंदा परतीच्या पावसाने नेहमीपेक्षा महिनाभर आधीच गाशा गुंडाळल्यामुळे शेतकऱ्याला रब्बी हंगामाची चिंता भेडसावत आहे. आता ऑक्टोबरमध्ये वरुणराजा प्रसन्न झाल्यासच रब्बी पिकांची खात्री बाळगता येणार आहे.
यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पावसाला प्रारंभ झाला असला, तरी एकाच वेळी सगळीकडे पाऊस झाला, असे चित्र नव्हते. काही गावांत जूनच्या पहिल्या आठवडय़ात, तर काही ठिकाणी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरिपाचा पेराही त्याच पद्धतीने राहिला. जिल्हय़ात या वर्षी ३ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. मात्र, हा पेरा दीड महिन्याच्या कालावधीत झाल्यामुळे काढणीही त्यानुसारच लांबणार आहे. गणेशोत्सव काळात चांगला पाऊस झाल्याने दाणे भरण्याच्या स्थितीत असलेल्या सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले. परतीचा पाऊस लवकर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सप्टेंबरअखेपर्यंत जिल्हय़ात केवळ १० टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण होईल. काढणीनंतर मशागतीला किमान आठवडा लागेल व नंतर रब्बी पेरणी करता येईल. सध्या जमिनीत ओल असल्यामुळे १० टक्के रब्बी पेरा हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर होऊ शकतो.
जिल्हय़ात रब्बी हंगामाचे सुमारे १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मांजरा धरणात पिण्यास पाणी नाही. त्यामुळे ते शेतीसाठी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. परिणामी, जिल्हय़ात उसाचे नवीन क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही. साहजिकच तीन-चार महिन्यांत घेता येणारी हरभरा, करडई, ज्वारी ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे.
ऑक्टोबरमध्ये रब्बी पेरा करायचा ठरवल्यास पावसाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांत पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांना धोका वाढला. मात्र, पाऊस पडला नाही म्हणून रब्बीचा पेरा झाला नाही, असे याआधी कधी घडले नाही. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात किमान ६० ते ७० मि.मी. हमखास पाऊस होतो. डिसेंबर महिन्यात पाऊस झाल्यामुळे मांजरा धरण भरल्याचे अपवादाने का होईना उदाहरण आहे. या वर्षी परतीचा पाऊस लवकर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली, तरी शेतकऱ्यांची मात्र ऑक्टोबरच्या पावसावर सारी भिस्त आहे. त्याला तडा न जाऊ देता पाऊस बरसला तरच रब्बीची शाश्वती आहे. बाजारात सध्या रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, बडी ज्वारी यांचे बियाणे विविध कंपन्यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवले आहे. आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा