‘त्या काळी जर तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, मॅटची सुविधा आणि पुरेसा आहार मिळाला असता तर निश्चितच राष्ट्रीय पातळीवरील प्रसिथ्द मल्लांमध्ये आपल्या नावाचा समावेश राहिला असता..’
आपल्याबद्दल असा आत्मविश्वास जेव्हा एखादा पहिलवान बाळगतो, तेव्हा त्यामागे असते कामगिरीचे पाठबळ. त्यामुळेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत कुस्तीमध्ये पुणे विद्यापीठाच्या झोळीत तब्बल पंचवीस वर्षांनंतर सुवर्णपदक टाकणारा पहिलवान जर असा आत्मविश्वास व्यक्त करीत असेल तर, तो फुकाचा कसा म्हणता येईल ? धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष संजय गिरी यांची त्यासाठीच दखल घेणे महत्वपूर्ण.
धुळ्यातील स्टेशनरोड म्हणजे झोपडपट्टय़ांचा परिसर. या परिसरातील साईबाबा व्यायामशाळेनेच गिरी यांना घडविले. शहरातील अनेक प्रसिध्द पहिलवानांचे व्यायामाचे ठिकाण म्हणजे ही शाळा. १९८२-८३ मध्ये कुमार वय असताना गिरी हे या व्यायामशाळेत जात. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या पहिलवानांची तालीम त्यांचे लक्ष वेधून घेत असे. या आवडीतूनच त्यांनी कुस्तीला जवळ केले. अल्पावधीतच त्यांनी कुस्तीचे डावपेच आत्मसात केले. पुढे गिरी यांनी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या कुस्ती स्पर्धेत २२ किलो गटात आपले पहिले पदक मिळविले. त्यानंतर पदक आणि गिरी यांचे नाते दिवसेंदिवस अधिकच दृढ होत गेले. १९८६-८७ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ४८ किलो गटात खेळणाऱ्या बलाढय़ पहिलवान काका पवार यांचे गिरी यांना प्रथम दर्शन झाले. काकांकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. तेव्हा पुणे, कोल्हापूर या शहरांमध्येच महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबीर प्रामुख्याने होत असे. अशा शिबिरांमध्ये काका पवार, गोविंद पवार, पप्पू यादव, आनंदा गायकवाड, यांसारख्या पहिलवानांचे अनुभवाचे बोल गिरी यांच्यासाठी मोलाचे ठरत. दिल्ली येथे ग्रीक रोमन कुस्ती प्रकारासाठी निवडण्यात आलेल्या संघाचे शिबीर होते. त्यावेळीही गिरी यांना काका पवार यांचा अधिक सहवास लाभला.
१९८९-९० मध्ये कोल्हापूर येथील स्पर्धेत आनंदा गायकवाडवर विजय, ९२ मध्ये ५२ किलो गटात खेळताना कोल्हापूरच्या मोहन पाटीलला पराभूत करून मिळविलेले सुवर्णपदक, या लढतींना गिरी यांच्या आयुष्यात खास महत्व. परंतु त्यापेक्षाही  उत्तरप्रदेशातील इटावा येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत त्यांनी पुणे विद्यापीठासाठी इतिहास रचण्याची किमया केली. या स्पर्धेत ५२ किलो गटात प्रसिध्द राष्ट्रीय पहिलवान राकेशकुमारवर गिरी यांनी १२-० अशी सहज मात केली. त्यामुळे कुस्तीमध्ये पुणे विद्यापीठास पंचवीस वर्षांनंतर प्रथमच सुवर्णपदक मिळाले. या कामगिरीची विद्यापीठाने दखल घेत त्यांचा गौरव केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर राजस्थानातील जयपूर येथे १९९३ मध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतही त्यांनी पदक मिळविले. त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेले ते एकमेव पदक होय.
‘सुरूवातीला आमची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. घरही अतिक्रमित क्षेत्रात. चार मुलगे आणि एक मुलगी, असा संसाराचा गाडा ओढताना मिल कामगार असलेल्या वडिलांची दमछाक होत असे. १९८३ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर मोठय़ा भावाने रोजंदारीवर काम करीत मला पाठबळ दिले. पुढे दोघा भावांचेही छत्र हरपले. परिस्थितीच बेताची असल्याने कुस्तीगीरासाठी जसा आहार आवश्यक असतो, तसा मिळणे शक्यच झाले नाही. सुरेशतात्या पाटोळे, अण्णागुरू पोपया या मार्गदर्शकांनी कुस्तीतील डावपेच शिकविले. परंतु तेव्हाच योग्य आहार मिळाला असता आणि मॅटवर सराव झाला असता तर वेगळाच गिरी दिसला असता..’
गिरी यांची ही भावना त्यांच्या एकंदर जीवनाविषयी बरंच काही सांगून जाते. कुस्तीमुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरी मिळाली. नाव गाजल्यानंतर शहरातील काहींनी आहारासाठी त्यांना मदतही केली. कुस्तीतील यशाने त्यांचे जीवन पालटले. आज सहावीत असलेला त्यांचा मुलगा तेजसही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत आहे. तालीम संघाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या सराव शिबीरात शहरातील सुमारे ८० मुलांनी सहभाग घेतला आहे. त्यांना गिरी यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू त्रिलोक गुंडलेकर, सचिन कऱ्हाडे, गणेश फुलपगारे, शिवाजी सोनार हे प्रशिक्षण देत आहेत. कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पंच म्हणूनही गिरी यांनी कामगिरी बजावली आहे.
‘याआधी धुळ्यात मॅट उपलब्ध नसल्याने पहिलवानांच्या कामगिरीवर परिणाम होत असे. सुमारे दिड वर्षांपूर्वी पालिकेने तालीम संघास मॅट उपलब्ध करून दिली. त्यातच राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक जिल्हा संघटनेस मॅट, यानुसार अजून एक मॅट उपलब्ध झाली. त्याचा फायदा आता युवा पहिलवानांना होत आहे. सनी सांगळे, आकाश परदेशी, मल्हार जगताप, श्रीनिवास कुटे, सुहास अम्पळकर, शेखर गवळी, पंकज शिंदे, यांच्याकडून भविष्यात अधिक आशा बाळगता येईल.’
गिरी यांनी बाळगलेली आशा फलद्रूप करण्याचे काम आता या खेळाडूंवर आहे.
खाशाबा जाधव स्मृती स्पर्धा, महापौर केसरी, कुमार केसरी, यांसारख्या स्पर्धाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या धुळे जिल्हा तालीम संघास शहरातील राजकीय मंडळींकडूनही पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader