‘‘लहान मुलांसाठी लेखन करणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. प्रस्थापित लेखकांनी ठरवून मुलांसाठी लिहिले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. शिक्षणात मुलांची प्रगती व्हावी म्हणून पालक प्रयत्न करतात; पण मुलांना घडविण्याची ताकद असणाऱ्या बालसाहित्याला पालकांकडूनही महत्त्व दिले जात नाही.’’ असे मत बालसाहित्यकार बाबा भांड यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमीतर्फे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बालसाहित्यिकांच्या मेळाव्यात पुरस्कार विजेत्या साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी भांड बोलत होते.
बालशौरी रेड्डी (हिंदी), अयूब साबिर (काश्मिरी), सुधा खरंगटे (कोंकणी), मुरलीधर झा (मैथिली), के. श्रीकुमार (मल्याळम), सगोलसेम इंद्रकुमार सिंह (मणिपुरी), शिशुपाल शर्मा (नेपाळी) यांच्यासह विविध भारतीय भाषांमधील बालसाहित्यिकांनी या वेळी आपला साहित्यिक प्रवास उलगडून दाखविला.
भांड म्हणाले, ‘‘देशातील साठ टक्के लहान मुले ग्रामीण भागांत राहतात. त्यांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब बालसाहित्यात त्या प्रमाणात दिसत नाही. आज बालसाहित्य निर्मितीबाबत परिस्थिती आव्हानात्मक आहे. प्रस्थापित लेखकांनी जाणूनबुजून मुलांसाठी लेखन करायला हवे. पाण्याचा प्रश्न, इतर पर्यावरणीय समस्या अशा अनेक गोष्टींची ओळख मुलांना बालसाहित्यातून करून देता येईल. बालसाहित्यकारांनी काळानुरूप विज्ञान-तंत्रज्ञानाचाही विचार आपल्या साहित्यात करायला हवा.’’
या वेळी भरविण्यात आलेल्या विविध भाषांतील साहित्यकृतींच्या प्रदर्शनालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रस्थापित लेखकांनी ठरवून लहान मुलांसाठी लिहावे- बाबा भांड
‘‘लहान मुलांसाठी लेखन करणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. प्रस्थापित लेखकांनी ठरवून मुलांसाठी लिहिले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. शिक्षणात मुलांची प्रगती व्हावी म्हणून पालक प्रयत्न करतात; पण मुलांना घडविण्याची ताकद असणाऱ्या बालसाहित्याला पालकांकडूनही महत्त्व दिले जात नाही.’
First published on: 22-11-2012 at 04:18 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer should write for small children baba bhand