मानवी जीवनाचे दर्शन हाच नाटकाचा प्रमुख उद्देश आहे. लेखनासाठी लेखकाची संवेदनशीलता जागृत असली पाहिजे. कारण, त्यांच्या अनुभवांच्या जाणिवेतून तो साहित्याची निर्मिती करीत असतो, असे प्रतिपादन नाटय़लेखक व दिग्दर्शक विशाल तराळ यांनी केले.
येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘नाटक व एकांकिका’ या विषयावरील कार्यशाळा नुकतीच झाली. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले होते.
ललित लेखक व पथनाटय़लेखक सुरेश गांजरे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर दिग्दर्शक गजानन संगेवार, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. दिलीप अलोणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निर्मला काकडे, विद्यापीठ प्रतिनिधी आनंद बोथले आदी मान्यवर उपस्थित होते. श्वेता नासरे हिच्या गणेशवंदननेने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक समन्वयक डॉ. अलोणे यांनी केले.
सर्व साहित्य प्रकारांमध्ये ‘नाटक’ हा अतिशय प्रभावी व वैशिष्टय़पूर्ण वाङ्मय प्रकार असून तो द्विरूपात्मक आहे. नाटक हे संहितेच्या रूपात एक साहित्यप्रकार असतो. रंगमंचावर घडणारा प्रयोग हे त्याचे नाटय़कलात्मक रूप आहे, असे सांगून गांजरे यांनी नाटय़निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखविली. संगेवार यांनी नाटय़लेखनासंबंधात मौलिक सूचना करून मार्गदर्शन केले. अंगभूत कौशल्याचा विकास करून इतर क्षेत्राप्रमाणे करिअरचा विचार करत असताना कलाक्षेत्राचाही विचार करावा. जिद्द आणि परिश्रमाने या क्षेत्रात झेप घेऊन नावलौकिक मिळवावा, असे आवाहन प्राचार्य आस्वले यांनी केले. या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांनी कोळीनृत्य सादर केले. त्यानंतर यवतमाळ येथील बाबाजी दाते महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांनी ‘मेंढरं’ ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली. नवनाटय़लेखक गौरव खोंड यांनी दिग्दर्शित केलेली ‘सरोगेट’ ही एकांकिका गौरव खोंड व अश्विनी गोरडे यांनी सादर केली. विशाल तराळ यांची ‘माणूस माझं नाव’ ही एकांकिकाही सादर झाली. श्वेता चव्हाण व भरत लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुरेंद्र अंदूरकर व प्रा. राजेंद्र कोठारी यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा