आजवर सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंतापदासाठी यावेळी प्रथमच गुरुवार, ११ जुलैला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. महानिर्मितीने या पद भरतीसाठी रितसर जाहिरात प्रसिध्द केली असून प्रकाशगड येथे होणाऱ्या या लेखी परीक्षेसाठी ४७ अभियंत्यांनी अर्ज सादर केले आहेत. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्यांचीच या पदी वर्णी लागणार असल्याने या परीक्षेची सर्वत्र चर्चा आहे.
तब्बल २३४० मेगाव्ॉट स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुरेश गोहत्रे ३० जूनला सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त आहे. आजवर सेवाज्येष्ठतेनुसार हे पद भरण्यात येत होते. परंतु, यावर्षी प्रथमच सेवाज्येष्ठता यादी डावलून मुख्य अभियंतापदासाठी थेट परीक्षा घेण्याचा निर्णय महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी घेतला.
त्यानुसार या पद भरतीसाठी महानिर्मितीने रितसर जाहिरात प्रसिध्द केली. महानिर्मितीच्या या जाहिरातीलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून ४७ अभियंत्यांनी या पदासाठी अर्ज सादर केले आहेत. या पदासाठी गुरुवार, ११ जुलैला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे होणार असून यासाठी एक तासाचा पेपर सेट करण्यात आलेला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. लेखी परीक्षा व मुलाखतीत चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणाऱ्याची शेवटी मुख्य अभियंता पदी निवड करण्यात येणार आहे. महानिर्मितीत अशा पध्दतीने प्रथमच परीक्षा घेण्यात येत असल्याने सर्वानाच या विषयी उत्सूकता आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत केवळ महानिर्मितीत कार्यरत असलेल्यांनाच सहभागी होता येणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात आजवर सेवाज्येष्ठतेनुसार या पदी निवड केली जायची. महानिर्मितीच्या या नव्या पध्दतीमुळे महानिर्मितीत कार्यरत असलेल्या सेवाज्येष्ठ अभियंत्यांच्या वर्तुळात तीव्र नाराजी आहे. सलग ३० वष्रे वीज केंद्राची सेवा केल्यानंतर सुध्दा मुख्य अभियंतापदी वर्णी लागत नसेल तर कामाला काय अर्थ, असे म्हणून त्यांनी ओरड सुरू केली आहे. असे असले तरी या परीक्षेमुळे सर्वाना समान संधी उपलब्ध करून दिली असल्याची चर्चा महानिर्मितीच्या वर्तुळात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा