सहकारी साखर कारखाने कमी होत असून, ते खासगीरीत्या चालविण्यास देण्याचा पायंडा चुकीचा असून, त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीसमोर नवनव्या अडचणी निर्माण होतील, अशी भीती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. सहकारी साखर कारखान्याचे सभासद हे कारखान्याचे मालक असून, सभासदांनी व संचालक मंडळाने ऊस दराचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.   
दिवंगत थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त कराड तालुक्यातील शेरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. तर केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.   
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या आर्थिक परिवर्तनात मोलाचे योगदान देणारी सहकार चळवळ अडचणीत आली आहे. सहकाराला पुन्हा ऊर्जित अवस्था देणे निश्चितच गरजेचे असून, त्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही चळवळ लोकाभिमुख व पारदर्शी करण्यावर शासनाचा भर आहे. सहकारातील गैरव्यवहारावर रिझर्व बँकेकडून कडक भूमिका घेतली जात आहे. बेशिस्त सहकारी संस्थांना जरब बसविण्याचे काम केंद्र शासन आणि रिझर्व बँकेने हाती घेतले आहे. परिणामी आता पारदर्शी प्रशासनातून सहकाराचा कारभार अपेक्षित आहे.
स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांनी ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देताना सहकार चळवळ भक्कम केली. त्यांच्या विचारातून सहकार चळवळीला ऊर्जितावस्था आणणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. ऊस दरासंदर्भात शेतकरी सभासद आणि संचालकांनी जिल्हावार एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा, किमान अधारभूत कि मतीपेक्षा कमी भाव देणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. सध्याचा दुष्काळ आणि अडचणीत असणारी साखर कारखानदारी अशा स्थितीत योग्य निर्णय घेतले गेले नाही तर सहकार चळवळ अडचणीत येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
९७ व्या घटना दुरुस्तीमुळे फेब्रुवारी २०१३ पर्यंत महाराष्ट्रातील सहकारी कायदा बदलायला हवा आणि यासाठी अभ्यास करून सहकाराची पुढील दिशा ठरविण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून, त्यामुळे ४० हजार कोटींची गुंतवणूक व ११ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचा कृषी पत पुरवठा केला गेला असून, १ लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज तर ३ लाखांपर्यंत ३ टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
शेरे येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ९७ लाखांचा पूल उभारण्यात येणार असल्याचे सांगताना शेरे परिसरातील विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, यशवंतराव मोहिते यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीला शास्त्रशुध्द दिशा देण्याचे काम करताना कृषी, औद्योगिक, सहकार चळवळ धोरण प्रभावीपणे राबविले.
हर्षवर्धन पाटील यांनी यशवंतराव मोहिते यांच्या नावाने उत्कृष्ट सहकारी संस्थांना पुरस्कार देण्याचा विचार असल्याचे सांगितले.
डॉ. इंद्रजित मोहिते, सुरेश भोसले, मदनराव मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एकनाथराव जाधव यांनी व्यक्त केले. मेळाव्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, माजी खासदार हिंदूराव निंबाळकर, अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा पोलीस प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना, अभिजित बांगर आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.   

Story img Loader