अनेक चुकीच्या धारणा धर्माच्या बाबत पसरलेल्या आहे. धर्म हा मुळात यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांना जोडणारा धागा सगळ्यांना जोडून ठेवणारा बंध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांनी केले. दा.कृ. उपाख्य काकासाहेब बल्लाळ स्मृतिदिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद व हिंदू धर्म’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
काहींच्या मते हिंदू हा धर्म नाही, तर काहींनी हा धर्म आहे पण.. नाही पण अशा संभ्रमित व्याख्या केल्या होत्या; परंतु इंग्रजीत सम्यक असा अर्थच हिंदू शब्दाला नाही. त्यामुळेच हा घोळ होतो. धर्मशाळा, धर्मार्थ दवाखाने, राजधर्म ही कर्तव्ये आहेत धर्म नव्हे. त्यासाठी हिंदू शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्माला इतर धर्माप्रमाणे ‘रिलिजन’ शब्द स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विविध भाषणांत वापरला. मात्र. त्यांच्या म्हणण्याचा खरेच तो अर्थ होता का? हे आधी तपासून बघणे अपेक्षित आहे. प्रत्येक धर्म हा कोणत्या तरी व्यक्तिनिष्ठेवर आधारलेला आहे. व्यक्तिपेक्षा तत्त्वांवर हिंदू धर्म अधिक भर देतो. तत्त्व ही देवापेक्षाही अधिक महत्त्वाची ठरतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीमद्भगवत गीता किंवा वेद होय, असे मा. गो. वैद्य या वेळी म्हणाले.
जगात असलेले धर्म खरेच धर्म आहेत का, धर्माचा अर्थ काय, त्यासाठी त्या शब्दाच्या मुळाशी जाणे गरजेचे ठरणार आहे. ‘धृव’ या धातूपासून धर्म शब्द तयार झाला असून धृव म्हणजे धरून ठेवणे, धारणा करणे, जोडून ठेवणे असा होतो. धर्मात सर्व चांगल्या गोष्टींना धरून ठेवण्याचे कसब आहे. व्यक्ती म्हणजे यष्टी आणि अनेक यष्टींची मिळून समष्टी तयार होते. त्यापेक्षा व्यापक सृष्टी आणि त्याच्यापेक्षाही व्याप परमेष्टी अर्थात परमेश्वराचा आहे. या सर्व गोष्टींना जोडणारा धागा म्हणजे धर्म असल्याचे मा.गो. वैद्य म्हणाले. घर स्वत:साठी बांधले तर धर्म होत नसून घर दुसऱ्याच्या निवासासाठी बांधले तर की धर्मशाळा होते. सर्वाच्या आरोग्यासाठी तयार करण्यात आलेले दवाखानेच धर्मार्थ होतात. नि:स्वार्थ बुद्धीने दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या गोष्टी धर्माच्या कक्षेत येत असल्याचे त्यांनी म्हटले. धर्म हा व्यापक असून अनेक गोष्टींवर आधारलेला आहे. त्यात तत्त्वनिष्ठा आहे. व्यक्तिनिष्ठा नाही. वैश्विक कल्याणाची प्राप्ती यातून होते. त्याच्याच जोडीला संस्कृतीचे मूल्य आहे. जीवनमूल्य आणि मूल्यनिष्ठा म्हणजे संस्कृती होय. मूल्य ही स्थायी आहेत. त्यासाठी किंमत मोजावी लागते. श्रीराम, शिवाजी सावित्री, आदींनी मूल्यनिष्ठा जपली असून त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
धर्माबाबत जगभरात अनेक चुकीच्या धारणा – मा.गो. वैद्य
अनेक चुकीच्या धारणा धर्माच्या बाबत पसरलेल्या आहे. धर्म हा मुळात यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांना जोडणारा धागा सगळ्यांना जोडून ठेवणारा बंध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांनी केले.
आणखी वाचा
First published on: 05-04-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrong understanding regarding religion in the world m g vaidya