पनवेल-शीव महामार्गावरील खारघर टोलनाका सुरुवातीच्या आंदोलनामुळे राज्यभर गाजला. परंतु काही दिवसांपासून खारघरचा टोलनाका येथील स्वच्छतागृहावरील चुकीच्या लेखनामुळे प्रवाशांच्या चर्चेचा विषय बनला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यापासून ते सामाजिक कार्यकर्ते जयंत टिळक यांच्यासारखे व्यक्ती ‘जुने पनवेल नका म्हणू पनवेल म्हणा’ असा आग्रह धरत असताना या सरकारी दिशादर्शक फलकावर इंग्रजीमध्ये ओल्ड पनवेल असे लिहिण्यात आले आहे. पनवेलच्या एसटी डेपोसमोरील उन्नत मार्गाखाली असलेल्या या फलकावर एमएमआरडीए व एमएसआरडीसी या दोन्ही प्राधिकरणाची चिन्हे छापल्याने सामान्य पनवेलकर या दोन्ही प्राधिकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
नवीन पनवेल वसाहतीच्या निर्मितीनंतर पनवेल शहराला जाणीवपूर्वक जुने पनवेल बोलण्याची सवय नागरिकांना लागली. परंतु या जुन्या-नवीनच्या वादात मूळ पनवेलची ओळख पुसली जाऊ नये म्हणून जयंत टिळक यांच्यासारख्या अनेकांनी पनवेलच म्हणा, अशा चळवळीला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी आमदार ठाकूर यांनीही सर्व सरकारी व निमसरकारी प्राधिकरणांना पनवेलच म्हणा व लिहा यासाठी लेखी पत्रे पाठविली होती. शीव-पनवेल महामार्गावरील शौचालयाऐवजी ‘सौचालय’ लिहिल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर लवकरच याच्या शुद्धलेखनाची दुरुस्ती करू असे सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे प्रवक्ते गोपाळ गुप्ता यांनी महामुंबई वृन्तात्तशी बोलताना सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पनवेलचा उन्नत मार्ग बांधला आहे. या प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधित फलकाची दोन दिवसातच पाहणी करून नागरिकांची मागणी असल्यास तसा नक्कीच बदल केला जाईल असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा