एखाद्या आपत्तीचा धोका समजला की, तिचा सामना कसा करावा यादृष्टीने मनुष्यबळ, साधनसामग्री आदींचे नियोजन करता येते. सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम, शाही मिरवणूक, साधू व भाविक ज्या ठिकाणी स्नान करणार आहेत तो घाट परिसर, प्रमुख रस्ते आदी शहरातील वेगवेगळ्या भागांत नेमक्या कोणत्या आपत्तीचा धोका संभवतो हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्यांचा सामना करण्यासाठी तजवीज करावी लागणार आहे. या पद्धतीने नियोजन झाल्यास आगामी कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल, असे मत यशदा व नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे मंगळवारी आयोजित आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. आपत्ती व्यवस्थापनावर पोलीस यंत्रणेला यशदामार्फत सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने केलेल्या तयारीचा आगामी काळात प्रत्यक्ष सरावाद्वारे आढावा घेण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेस ‘यशदा’चे संचालक डॉ. संजय चहांदे, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ कर्नल व्ही. एन. सुकनीकर, लेफ्टनंट कर्नल पी. के. पाठक, यशदाचे सहाय्यक प्राध्यापक सुधीर राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप दिवाण व पंकज डहाळे उपस्थित होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकनगरीत दाखल होणार आहेत. अलाहाबाद व नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा यात बराच फरक आहे. अतिशय मध्यवस्तीत भरणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यात उसळणाऱ्या गर्दीचे नियंत्रण हे प्रमुख आव्हान ठरते. जागा अतिशय कमी असल्याने भाविकांची कोंडी टाळणे अवघड होते. घाटाकडे अर्थात पात्राकडे येणारे सर्व मार्ग अतिशय अरुंद असल्याने लाखो भाविकांच्या गर्दीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता बळावते. मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीप्रसंगी अशीच चेंगराचेंगरीची घटना घडून ३४ हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत दोन कार्यशाळा आधीच झाल्या असून तिसऱ्या कार्यशाळेत आपत्तीला तोंड देताना यंत्रणेची सज्जता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
अलाहाबादच्या कुंभमेळ्यात आपत्तीचे अतिशय नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले होते. परंतु त्या नियोजनात रेल्वे स्थानक परिसरात त्रुटी राहिली. त्याचा परिणाम दुर्घटनेला सामोरे जाण्यात झाल्याची बाब तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे सिंहस्थ काळात वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आपत्तींचा धोका संभवतो, याचा सखोलपणे अभ्यास करण्याची गरज आहे. हे धोके लक्षात आल्यावर आपत्तीचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी, त्या त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी आवश्यक ठरणारी सामग्री, मनुष्यबळ यांची व्यवस्था करता येईल.
आपत्ती व्यवस्थापन करताना काय व्यवस्था करावी लागणार आहे याचा फारसा विचार केला जात नाही. आपत्तीला तोंड देताना गर्दीला थांबविण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळ्या, गर्दी वाढल्यास काही मोकळ्या जागांची राखीव उपलब्धता, सभोवताली नजर ठेवण्यासाठी टेहेळणी मनोरे अशा अनेक घटकांची गरज भासते. पोलीस यंत्रणेने या अनुषंगाने प्राथमिक तयारी केल्यावर प्रात्यक्षिकाद्वारे त्याची चाचणी घेता येईल. या माध्यमातून उणिवांची खातरजमा होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
मागील सिंहस्थातही धोक्याची यंत्रणांना पुरेपूर जाणीव होती. त्यावर चर्चा झाली. परंतु, ठोस उपाययोजना करण्यात दुर्लक्ष झाले. त्याची परिणती चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत झाली. सिंहस्थाचा सर्व शासकीय विभागांनी व्यापकपणे विचार करण्याची गरज असल्याचे सरंगल यांनी सांगितले.
प्रत्येक विभाग केवळ आपल्या नियोजनाचा विचार करतो. आपत्ती व्यवस्थापन हे सर्व यंत्रणांचे काम असून, त्या अनुषंगाने तयारी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतर शासकीय विभाग थंडच
सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणेला इतर शासकीय यंत्रणांनी आवश्यक ते सहाय्य पुरविणे अत्यावश्यक आहे. तथापि, सिंहस्थातील एकूणच नियोजनाचे गांभीर्य इतर विभागांच्या लक्षात येत नसल्याचे लक्षात येते. पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने तयारीला लागली असताना इतर शासकीय विभागांच्या पातळीवर मात्र शांतता आहे. इतर विभागांची ही अनास्था आपत्ती व्यवस्थापनात धोकेदायक ठरू शकते.

Story img Loader