केंद्र व राज्य शासनाच्या शिक्षण विषयक योजनांचा महिलांनी लाभ घेणे आवश्यक आहे. मुक्त शाळांची संकल्पनाही त्यांना रुजविता येईल. देश शंभर टक्के साक्षर करण्यासाठी महिलांनी साक्षरतेची चळवळ उभारावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केले. यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्यस्तरीय निर्धार कार्यशाळेचे मंगळवारी सकाळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सपकाळ नॉलेज हब येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी राजेश टोपे व अभियानाच्या संचालिका खा. सुप्रिया सुळे वगळता राष्ट्रवादीचा कोणताही दिग्गज नेता उपस्थित नव्हता. मंत्री मंडळातील फेरबदल आणि शपथविधी सोहळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांना ऐनवेळी दांडी मारणे भाग पडले. खा. सुळे यांचेही लक्ष मुंबईतील घडामोडींकडे लागले होते. यामुळे उद्घाटन सोहळा झाल्यानंतर प्रमुख नेते व खुद्द खा. सुळे यांनीही मुंबईकडे प्रयाण केले.
सलग पाच दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत बचत गटातील सुमारे १५०० महिला सहभागी झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या १२० हून अधिक कार्यकर्तीचाही त्यात समावेश आहे. याप्रसंगी आ. हेमंत टकले, आ. जयंत जाधव, आ. विद्या चव्हाण, विनायकदादा पाटील, विश्वास ठाकूर, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ आदी उपस्थित होते.
यावेळी टोपे यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांना बचत गट चळवळीत सामावून घेण्याची गरज अधोरेखीत केली. त्यांना सक्षम व साक्षर करणे आवश्यक आहे. महिलांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांची गरज आहे. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास व आत्मनिर्भरता निर्माण होण्यासाठी बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. महिला सक्षम झाल्या तरच, समाज सक्षम होईल. आज युवती व महिलांनी विविध क्षेत्रात घेतलेली भरारी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील महिला सामाजिक प्रश्नांतही पोटतिडकीने सहभागी होतात. त्यांनी राजकारणातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यशस्विनी सामाजिक अभियान समाजविकासाची आदर्श ठरेल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.
खा. सुळे यांनी महिलांनी पारंपरिक त्यागी व सहनशील मानसिकता सोडून नवी आत्मविश्वासाची पायवाट शोधायला हवी, असे नमूद केले. विकास प्रक्रियेत महिलांचे मोलाचे योगदान आहे. आता महिलांनी स्वत:त बदल घडविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान या आधुनिक तंत्राचा कौशल्यपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांची कार्यक्षमता, कर्तृत्व व उमेदीला बळ देऊन आर्थिक विकासाच्या पर्वाला सुरूवात होत आहे. महिलांनी आरोग्य, विमा या योजनांचा लाभ घेऊन सुरक्षितता जपण्यास प्राधान्य द्यावे. बिकट अवस्थेतील महिलांना उभारी देऊन तिला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, असे आवाहन खा. सुळे यांनी केले.
आ. टकले यांनी निर्धार कार्यशाळा म्हणजे महिलांच्या एकत्र येण्यातून एकमेकांना समजून घेऊन नेतृत्व घडविण्यासाठीचा अभ्यास प्रयोग असल्याचे सांगितले तर आ. विद्या चव्हाण यांनी आव्हानांचा सामना आणि स्वीकार कसा करावा याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन महिलांना भविष्यकालीन वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल, असे सूचित केले. उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यशाळेत ध्येय निश्चिती व अपेक्षा पूर्ततेचे व्यवस्थापन, वस्तुस्थिती ओळखून हुशारीने ध्येय निश्चित करण्याची उपयुक्तता या विषयावर संवित स्कूल ऑफ इन्फ्रास्क्ट्रक्चर बिझनेस संस्थेच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर सर्वच प्रमुख नेत्यांनी मुंबईकडे धाव घेतली.