‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’, ‘गंगाजल’मधील ‘सुंदर यादव’, ‘सिंग इज किंग’मधील ‘पंकज उदास’, ‘रावडी राठोड’ मधला ‘इन्स्पेक्टर विशाल शर्मा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील बॅण्डमधला गायक अशा अनेक व्यक्तिरेखा साकारून त्या अजरामर करणारा गुणी अभिनेता यशपाल शर्मा याने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांतून बिहारी, उत्तर भारतीय तरुणाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता प्रथमच यशपाल शर्मा मराठी राजकीय कार्यकर्त्यांची भूमिका साकारतोय. ‘म्योहो : दी मिस्टिक लॉ’ या हिंदी चित्रपटात तो ‘सदाशिव आपटे’ ही मराठी कार्यकर्त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अतिशय अस्खलित मराठीत संवाद म्हणताना दिसेल.
रंजन शांडलिया यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात यशपाल शर्मा व्यतिरिक्त अदिती भागवत, अनिल मांगे, राज सिंघ चौधरी, कंवलजित सिंह, संजय त्रिपाठी, पारूल चौहान, औरोशिका देव, बिजेंद्र काला आदी कलावंत वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत.
आपल्या या मराठी व्यक्तिरेखेसंदर्भात बोलताना यशपाल शर्माने सांगितले की, एखाद्या राजकीय पक्षाचा मराठी कार्यकर्ता ज्या पद्धतीने संवादफेक करील त्या पद्धतीने संवादफेक करता येण्यासाठी दिग्दर्शकाने आपल्याकडून भरपूर मेहनत करून घेतली. मराठी उच्चारांसाठी आपणही खूप प्रयत्न केले, अनेक दिवस सराव केला आणि नंतरच भूमिका साकारली, असेही तो म्हणाला.
गेल्या काही काळापासून हिंदीच्या रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेतील कलावंतांनी मराठी व्यक्तिरेखा साकारण्याचे प्रमाण खूप असल्याचे आढळून आले आहे. मुख्यत्वे बॉलीवूड चित्रपट मुंबईत तयार होतात. तसेच राणी मुखर्जीपासून प्रियांका चोप्रा, शाहीदपासून आमिर खान-अक्षय कुमार-गोविंदा-संजय दत्त-जॅकी श्रॉफ यांसारखे बहुतांश कलावंतांचे आयुष्य आणि करिअरही मुंबईतच घडले. त्याचबरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्ये तंत्रज्ञ, संकलक यापासून ते साहाय्यक दिग्दर्शन, सहछायालेखक असोत की चित्रपटाच्या वेगवेगळ्या विभागांत मराठी लोक मोठय़ा प्रमाणावर काम करीत असल्यामुळेही मराठी व्यक्तिरेखा, मराठी संस्कृती, मराठी भाषा यांची ओळख ‘बॉलीवूड बिगीज’ना झालेली असते. अलीकडेच आलेल्या ‘अय्या’ चित्रपटात राणी मुखर्जीने मराठी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
‘कमिने’मध्ये प्रियांका चोप्रानेही मराठी तरुणी साकारली होती. यामुळेही मराठी भाषेचा हिंदीतील अमराठी कलावंतांवर मोठय़ा प्रमाणावर प्रभाव असल्याचे दिसून येते. त्यातूनच मराठी व्यक्तिरेखा मध्यवर्ती ठेवून चित्रपट करण्यास सुरुवात झाली असावी. अस्सल बिहारी किंवा उत्तर भारतीय दिसणारा यशपाल शर्मा आता ही मराठी व्यक्तिरेखा कशी साकारतो आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देतात हे ‘म्योहो: द मिस्टिक लॉ’ हा चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना समजेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा