महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांचा ऋणानुबंध नाशिकशी १९६२ मध्ये जुळला. या वर्षी चीनने भारताचा पराभव केल्यानंतर निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती सावरण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी ‘यशवंतराव बळवंतराव चव्हाण’ यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलविले. मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना दिल्लीच्या तख्तावर विसावण्यासाठी खासदार होणे आवश्यक होते. त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकने पुढाकार घेतला.
लोकसभा निवडणुकीत यशवंतरावांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नाशिक येथील एका सभेत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी यशवंतरावांविषयी ‘भूगोलात कृष्णा गोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीने हा संगम इतिहासात घडवून आणला,’ असे उद्गार काढले होते. नाशिकमधील याच सभेत यशवंतरावांनी ‘नाशिकचे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही,’ असे आश्वासन दिले होते.
संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मिग विमान कारखाना (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल) नाशिकजवळील ओझर येथे सुरू करून त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले. १९६३ च्या जून महिन्यात संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचे आजारपण हृदयाशी निगडित असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. नंतर हृदयाला काहीही धक्का लागलेला नसून आमरसाचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजारपणाची बातमी पंतप्रधान नेहरूंना कळली. त्यांनी यशवंतरावांना पत्र लिहिले. ‘मनाला बसलेल्या धक्क्यापेक्षा नंतरचा निर्वाळा फार मोलाचा होता,’ असे त्यात म्हटले होते.भाऊसाहेब हिरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुतळ्याचे अनावरण नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या गावी करावयाचे होते. मुख्यमंत्री असलेले यशवंतराव स्वत: पुतळा अनावरणासाठी आले होते. नाशिकचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गायकवाड यांच्या सत्कारासाठी ऑक्टोबर १९६८ मध्ये यशवंतराव नाशिक येथे आले होते. त्या वेळी त्यांनी दादासाहेबांविषयी बोलताना ‘मोठय़ांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मिळणारे मोठेपण आता इतिहासजमा झाले आहे. आधुनिक काळात समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक आव्हाने निर्माण होत असतात. त्यांचा धैर्याने स्वीकार करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा जी माणसे प्रयत्न करतात, तीच माणसे मोठी होतात. दादासाहेब गायकवाड हे त्यापैकीच एक,’ अशी भावना व्यक्त केली होती. अशा दिलदार स्वभावाच्या यशवंतरावांचे नाशिक हे एक आवडते शहर होते.
– अॅड. मयूर जाधव, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सोशल फोरम, नाशिक (९०११०७८४४८)
यशवंतराव व नाशिक
महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांचा ऋणानुबंध नाशिकशी १९६२ मध्ये जुळला. या वर्षी चीनने भारताचा पराभव केल्यानंतर निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती सावरण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी ‘यशवंतराव बळवंतराव चव्हाण’ यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलविले.
आणखी वाचा
First published on: 12-03-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao and nashik