यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त शहराच्या विविध भागांत लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र यांच्या वतीने यशवंतरावांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी व्याख्यानमाला झाली.
गंगापूर रोडवरील प्रमोदनगरमधील श्रीसमर्थ ज्येष्ठ नागरिक संघात ‘संरक्षणमंत्री यशवंतराव’ या विषयावर बोलताना अ‍ॅड. मयूर जाधव यांनी चीन, पाकिस्तान व बांगलादेश या तीन युद्धांप्रसंगी यशवंतरावांनी जे निर्णय घेतले त्यावरून संरक्षणशास्त्राचा यशवंतरावांचा किती आणि कसा अभ्यास होता हे लक्षात येते, असे सांगितले. या वेळी नगरसेविका सीमा हिरे अध्यक्षस्थानी होत्या.
जेलरोडवरील श्री दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघात ‘कथा यशोगाथा’ या विषयावर बोलताना प्रा. यशवंत पाटील यांनी पाणी, वीज, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत प्रभावी योजना राबविणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची सहकारविषयक भूमिका मांडली. नगरसेवक शैलेश ढगे अध्यक्षस्थानी होते. महात्मानगर ज्येष्ठ नागरिक संघात ‘कृष्णापुत्र यशवंतराव’ या विषयावर बोलताना आशा पाटील यांनी यशवंतरावांच्या जन्मापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंतचा त्यांचा धावता जीवनपट उलगडून दाखविला. त्यांच्या मातोश्री विठाई यांनी ज्या धीराने संसार सांभाळला त्याची माहिती दिली.
गोविंदनगरमधील श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघात ‘यशवंतरावांच्या सहवासात’ या विषयावर माजी वनमंत्री विनायकदादा पाटील यांचे व्याख्यान झाले. अनेक व्यक्तिगत व सार्वजनिक आठवणी कथन करत सुसंस्कृत, साहित्यिक व ग्रंथप्रेमी असे यशवंतराव यांचे व्यक्तिमत्त्व होते, हे नमूद केले. अध्यक्षस्थानी नगरसेविका अश्विनी बोरस्ते होत्या. पंचवटीतील औदुंबरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळात ‘पत्रकारितेत भेटलेले यशवंतराव’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले यांनी संरक्षणमंत्री असताना नाशिकला आजारी पडल्याच्या यशवंतरावांविषयीच्या बातमीचा प्रसंग, कराडहून आलेल्या एका वृद्ध महिलेचा प्रसंग, दिल्लीत समाजवादी नेते मधु लिमये यांच्यात आणि त्यांच्यात ग्रंथांची होणारी देवाणघेवाण, या प्रसंगांविषयी माहिती दिली. राजीवनगरमधील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघात ‘कथा यशवंतरावांच्या’ विषयावर बोलताना डॉ. तुषार चांदवडकर यांनी अनेक उदाहरणांसह यशवंतरावांचा युद्धाचा अभ्यास कसा होता, हे स्पष्ट केले. सहाही व्याख्यानांप्रसंगी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष रमेश देशमुख, कार्याध्यक्ष शरद बुरकुले, कार्यवाह द. म. कुलकर्णी, कोषाध्यक्ष जितेंद्र येवले, भालचंद्र गायधनी, प्रतिष्ठानचे राजेंद्र देसले, नवीन तांबट, श्याम दशपुते, विठ्ठल सावंत उपस्थित होते.

Story img Loader