यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सामाजिक न्याय विभागमंत्री शिवाजी मोघे यांना साकडे घालण्यात आले. याविषयी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन मोघे यांनी दिले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २०११-१२ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या चार लाख २७ हजार विद्यार्थ्यांपैकी ३९,८३३ विद्यार्थी अनुसूचित जातीचे आणि २१,६९४ विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. यंदा पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४८ टक्के ग्रामीण आणि ५२ टक्के विद्यार्थी शहरी भागातील आहेत. त्यात नोकरी व्यवसाय करून पारंपरिक शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी मनसेने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे आधीच केली होती. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग व आर्थिक मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे वेळोवेळी मनविसेच्या वतीने मागणी करण्यात आली. मात्र याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याने मनविसेच्या शिष्टमंडळाने मोघे यांची भेट घेतली.
या वेळी चर्चेअंती नागपूर येथे सुरू होणारे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने बैठक बोलविण्यात येईल असे आश्वासन मोघे यांनी दिले आहे. बैठकीला मनविसेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे, चेतन पेडणेकर, शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, अजिंक्य गिते आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती गिते यांनी दिली.

Story img Loader