आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यशवंतराव चव्हाण पुणे शाखेतर्फे १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत यशवंतरावांचे जीवनदर्शन घडविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुरू करण्यात येत असलेल्या ‘मज्जाच मज्जा’ या त्रमासिकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
बालगंधर्व कलादालन येथे १८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पुराभिलेख विभागाने यासाठी सहकार्य केले असून २० तारखेपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. दुसऱ्या दिवशी (१९ ऑक्टोबर) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी दहा वाजता ‘मज्जाच मज्जा’ या त्रमासिकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून महापौर वैशाली बनकर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या वेळी वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया, आमदार अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब िशदे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ उद्योगपती निळकंठ कल्याणी आणि भटक्या-विमुक्तांसाठी कार्य करणारे ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या पुणे शाखेचे सचिव अंकुश काकडे आणि शांतिलाल सुरतवाला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

yashwantrao chavan  photographe, exhibition at pune

Story img Loader