यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी माणसाला जे हवे आहे ते आत्मसात करत साहित्य, कुस्ती, तमाशा, भजनाशी संगत केली म्हणूनच ते महाराष्ट्र समजूही शकले आणि बदलूही शकले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
येथील स्वर्गीय वेणूताई चव्हाण सभागृहात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीतर्फे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. इचलकरंजीच्या प्रबोधन प्रकाशज्योतीचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी प्रकट मुलाखत घेतली. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी, अ‍ॅड. सयाजीराव पाटील, प्राचार्य प. ता. थोरात, प्रा. मो. नि. ठोके, मोहनराव डकरे यांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ. मोरे म्हणाले, की यशवंतरावांच्या जन्माच्या कालखंडात देशात व राज्यात नेतृत्वाची उणीव होती. विद्यार्थिदशेत असताना यशवंतराव चव्हाण यांच्यावर टिळक, गांधी, मानवेंद्र रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला. कोणताही एक विचार न घेता लोकहिताचा, समाजात विधायक बदल घडविणारा सामाजिक न्याय व स्वातंत्र्याचा विचार त्यांनी स्वीकारला. हे त्यांच्या विचारांचे मोठेपणच भविष्यातील राजकीय नेतेपदाची चुणूक दाखवणारी अशी होती. आदर्श काँग्रेस कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श त्यांनी स्वत:हून कार्यकर्त्यांपुढे ठेवला. राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या विचारांचे लोक घडविले.
नेतृत्व करण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत ते त्यांनी इतरांतून स्वीकारले. सन १९६० पूर्वी भांडवलदार, उच्चवर्णीयांचे मुंबई प्रांतावर वर्चस्व होते. अशा मंडळींना आपलेसे करत १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते बनले. मुख्यमंत्री होताच त्यांनी पंडित नेहरूंना महाराष्ट्राचा सहकार पॅटर्न पटवून दिला. राजकारण हा व्यवहार त्यांनी सांभाळला. कधी घाई केली नाही. त्यांनी स्वत:हून कधीच राजकीय खेळी केली नाही असे अनेक नेतृत्व पैलू त्यांनी आत्मसात केल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राने वाचक बनावे असा त्यांचा कायमच आग्रह होता. अनेक साहित्यिक, लेखक यांच्याशी त्यांचा सहवास होता. यशवंतरावांनी समाज स्वाभिमानी व चालता बोलता झाला पाहिजे हे महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिले. सत्ता दीनदुबळय़ांसाठी, समाज एकसंधतेसाठी वापरली. यातूनच त्यांनी महाराष्ट्र घडविल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा