यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चित्ररथ व ग्रंथदिंडीसह काढण्यात आलेल्या शोभायात्रेस मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये विविध शाळांचे विविध विषयांवर आधारित २० चित्ररथ सहभागी झाले होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या येथील विरंगुळा निवासस्थानापासून रॅलीस दिमाखात प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती नीलमताई पाटील-पार्लेकर, पंचायत समिती सभापती देवराज पाटील, उपसभापती विठ्ठलराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य विद्या थोरवडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड केंद्राचे सचिव मोहन डकरे यांच्यासह मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
शोभायात्रेत यशवंतराव चव्हाण यांची गं्रथसंपदा ठेवण्यात आली होती. नूतन मराठी शाळा, विठामाता विद्यालय, कन्या प्रशाला, टिळक हायस्कूल, सरस्वती विद्यालय, संत तुकाराम हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल, शाहीन हायस्कूल, रोटरी स्कूल, दि. का. पालकर हायस्कूल, शिवाजी विद्यालय, हौसाई कन्याशाळा, श्यामराव पाटील विद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा, का. ना. पालकर या विद्यालयांनी तयार केलेले चित्ररथ सहभागी झाले होते. दरम्यान, नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले.