यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे आमदार माणिकराव ठाकरे निवडणूक लढण्याच्या तयारीत असून त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात दौरे वाढविले आहेत. गेल्या १० वर्षांंपासून हा मतदार संघ सेना-भाजप युतीच्या ताब्यात आहे. भाजप च्या तिकीटावर हरिभाऊ राठोड या मतदारसंघातून निवडून आले होते. नंतर मात्र त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवास करून या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, पण सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली होती. दिवंगत खासदार उत्तमराव पाटील यांनी कॉंगेसतर्फे या मतदारसंघात सहा वेळा विजय प्राप्त केला होता, मात्र भाजपच्या तिकीटावर लढलेल्या हरिभाऊ राठोड यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर उत्तमराव पाटील कॉंगेसमध्ये दुर्लक्षित आणि अपमानित होत गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॉंगेसचा त्याग करून माजी उपमुख्यमंत्री रा.कॉ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांॅग्रेसमध्ये प्रवास केला होता.
उत्तमराव पाटलांना राष्ट्रवादी कॉंगेसमध्ये आणण्यासाठी आमदार संदीप बाजोरिया यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नानंतर कॉंगेसमध्ये लोकसभा लढवणारा सक्षम नेता नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. हरिभाऊ राठोड यांच्या पराभवानंतर कांॅगेसमध्ये लोकसभेसाठी उमेदवारांची वानवा निर्माण झाली. ही पोकळी भरून काढणासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्याचा विचार पक्षात सुरू आहे. माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्षपद सोडून मंत्रीपदासाठी उत्सुक असल्याच्या चच्रेच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा देखील जोरात आहे. १८ नोव्हेंबरला यवतमाळला कांॅग्रेस पक्षाचे निरीक्षक गिड्ड रूद्रा राजू हे येत असून लोकसभा उमेदवारीसाठी चाचपणी करणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विशेषत: अजितदादा पवार आणि आमदार संदीप बाजोरिया माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका करतांना जनतेतून निवडून येण्याची क्षमता नसलेला नेता प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान आहेत, असे म्हणत असतात. राष्ट्रवादीच्या या टीकेला उत्तर देतांना मी सलद चार वेळा दारव्हा  विधानसभा मतदार संघातून निवडून आलो होतो, याची आठवण माणिकराव ठाकरे करून देतात.
आता ठाकरे यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघासाठी तयारी चालविली आहे. या संदर्भात विचारले असता पक्ष जो कोणता निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण वागणार असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा