शेतीमध्ये कामे करण्यापेक्षा शहराकडे ग्रामीण भागातील नवीन पिढी धाव घेत असल्यामुळे शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील गहू निघताच नवीन सालगडी पुढील हंगामासाठी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आपसातच स्पर्धा लागली आहे. सालगडींच्या वार्षिक पगारात गतवर्षीच्या तुलनेत पाच हजाराची वाढ झाली असून सालगडी गावात व परिसरात मिळणे कठीण झाल्याने झाडीपट्टीतून तर काही मध्यप्रदेशातून सालगडी कुटुंबासह शेतात ठेवत आहेत.
दहा एकर शेतासाठी सालगडी ठेवला जात असतो. दहा एकर पेक्षा कमी किंवा तेवढीच जमीन असल्यास आणि पूर्णत:शेतमालक शेतीत वावरणारा असल्यास तो स्वत:च शेती करतो; परंतु जर का शेतमालक हाडाचा शेतकरी नसेल तर त्याला मात्र सालगडी ठेवावाच लागत असतो. तसेच १० एकर शेतजमिनीसाठी ३५ ते ४० हजार रुपये रोख तसेच गहू आणि डाळ देण्याची पद्धत आहे. शिवाय ओलिताची शेतजमीन असेल तर पाच हजाराने ही किंमत वाढून दिली जाते.
निसर्गाच्या लहरीपणावर हा ग्रामीण भागातही खेळला जाणारा शेती जुगार असल्याची भावना नवीन पिढीत निर्माण झाल्याने शहरात लहान मोठे काम करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे शेती करण्यास शेतकऱ्याची दुसरी पिढी शेती तयार नसल्याने सालगडी व मजुरांचा तुटवडा शेतीच्या कामासाठी निर्माण झाला आहे. शेतमालकांची मोठी कोंडी होत असून शेतमालक या गावावरून त्या गावावरून सालगडी शोधात फिरत आहे. त्यासाठी कोणी झाडीपट्टीतून कोणी मध्यप्रदेशातून कुटुंबासह सालगडी आणत आहेत. दुसरीकडे शेतकरी शेतमालक आहेत ते स्वत: शेतामधील कचरा उचलणे, कचरा जाळणे, जमीन वखरणे, नांगरणे आणि पहिल्या पावसातच पेरणी करण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळीच न्याहारी घेऊन शेतकरी दुपारी कामे आटोपून घेत असून जेवायच्या वेळी घरी येऊन पुन्हा सूर्य मावळेपर्यंत शेतात राबत आहे. कारण दिवसा उन्हात काम होत नसल्याने अशाप्रकारे काम करत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात लग्नाचा मोसम असल्याने लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भान ठेवून तो शेतीची कामे करत आहे. आता हिवाळी भाजीपाला संपला असून उन्हाळी भाजीपाला बाजारात येण्याची सुरुवात होत आहे. या मोसमात प्रकृतीला मानणारा थंडगार भाजीपाला येऊन उन्हाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून ओलिताच्या शेतीवर काम करण्यास वेगळेच सालगडी ठरवलेले असून त्यांना कुटुंबासह शेतात ठेवावे लागते. विकण्यायोग्य तयार झालेला भाजीपाला व़ेळेवर तोडून बाजारपेठेत आणावा लागतो. त्याची किंमत लागत नसून उशीर झाला तर त्याचा दर्जाही कमी होतो. अशा भाज्यांना ग्राहक कमी भावात मागणी करतो. शेतक ऱ्याला अपेक्षित मोबदला मिळत नाही. तेव्हा बारमाही मजूर ओलिताच्या शेतीत ठेवणे आवश्याक असते. आता सालगडय़ांच्या कमतरतेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आल्यासारखी स्थिती आहे.
शेतीसाठी सालगडी मिळेना..
शेतीमध्ये कामे करण्यापेक्षा शहराकडे ग्रामीण भागातील नवीन पिढी धाव घेत असल्यामुळे शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील गहू निघताच नवीन सालगडी पुढील हंगामासाठी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आपसातच स्पर्धा लागली आहे.
आणखी वाचा
First published on: 13-04-2013 at 03:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yearly labour not avalilable for farm