राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच आपली नियुक्ती केली असल्याचा दावा सोमेश्वर येलचलवार यांनी पत्रकार परिषदेत केला. सोमेश्वर येलचलवार आणि त्यांच्या दोन संस्थांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीएक संबंध नसून राष्ट्रवादी सिक्युरिटी फोर्स आणि राष्ट्रवादी क्रीडा संघटना या दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे नाव अकारणच वापरले गेले आहे. येलचलवार हे राकाँचे सदस्यही नाहीत, असा आरोप राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता सोमेश्वर येलचलवार यांनी त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे, असे सांगितले.
याउलट राजेंद्र वैद्य यांनीच पक्षावर अतिक्रमण केले आहे, असा प्रत्यारोप त्यांनी केला. वैद्य यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. शिवाय राजेंद्र वैद्य यांनी आपल्याबद्दल जातीवाचक वक्तव्य केले असल्याचा आरोप ठेवत, त्यांच्याविरुद्ध बदनामी आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री व पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि विनोद दत्तात्रेय यांनी आपली नियुक्ती केली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही नोंदणीकृत कंपनी आहे. अशी कंपनी पक्षाची कशी राहू शकते, असा प्रश्नही येलचलवार यांनी उपस्थित केला आहे. वैद्य यांच्या तक्रारीवरून पक्षश्रेष्ठींनी आपणास मुंबईला बोलावून आपल्याकडून हमीपत्र लिहून घेतले असल्याची कबुली येलचलवार यांनी दिली.

Story img Loader