ऐतिहासिक संस्कृती आणि उत्सव यांचे अतुट नाते परंपरेनुसार सांभाळणारे गाव म्हणजे येवला. दरवर्षीप्रमाणे प्रेम, उत्साह आणि स्नेहांच्या वर्षांवात रंगांची उधळण करण्यासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. पैठणीचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या शहरात रंगपंचमीच्या दिवशी रंगणाऱ्या सामन्यात पैठणीचे सप्तरंग उधळले जातात. विशेष म्हणजे, या दिवशी रंगणाऱ्या सामन्यात महिला संघही सहभाग नोंदवतात.
रंगपंचमी तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ कच्चा रंग, माती व नैसर्गिक रंगासह विविध आकारातील पिचकाऱ्या व तत्सम साहित्याने सजली आहे. शुक्रवारी सकाळपासून बाल गोपाळांच्या रंगपंचमीला सुरूवात होईल. दुपारनंतर युवा वर्गाच्या रंग उधळीने महोत्सवात रंग भरण्यास सुरूवात होईल. रंग पंचमीसाठी खास पैठणीच्या रंगाची भट्टी तापवून रंगाचे विशिष्ट मिश्रण तयार करण्यात येणार आहे. लाल रंग टाकून हे मिश्रण पक्का रंग म्हणून खेळण्यासाठी वापरतात. रंगाची उधळण करण्यासाठी सज्ज असलेला उत्साही समुह हलकडीच्या तालावर एकमेकांना आवाज देत रंगपंचमीचे ‘सामने’ खेळण्यासाठी घराबाहेर पडतो. यावेळी सामन्यांचा अंदाज येण्यासाठी चाचपणी केली जाते. महिला वर्गही यात कुठेही मागे नसतो. त्या देखील टिळक मैदानावर मोठय़ा संख्येने जमा होतात. सामन्यांपूर्वीच महिला वर्गाच्या रंगपंचमीला सुरूवात होते. सामन्याची पूर्वतयारी सामनावीरांकडून होत असताना आयोजकांकडून सामन्यासाठी आवश्यक रंगाचे साहित्य बैलगाडी तसेच मालमोटारीवर आणले जाते. मोकळ्या मैदानात विविध पक्क्या रंगानी भरलेले पिंप आणले जातात. मुख्य तालीम संघाचे जवान मैदानात उतरतात. एकिकडे ३० ते ४० पाण्याने भरलेले पाण्याचे बंब तर दुसरीकडे रंगीत पाण्याचे पिंप या माध्यमातून सामन्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येते. शिवसैनिक ज्योती सुपेकर यांच्या पुढाकाराने सामन्यांमध्ये आता महिला संघ यंदाही लक्षणिय सहभाग नोंदविणार आहे. प्रत्यक्ष सामना सूरू होण्यापूर्वी जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव अशा घोषणांनी, हलकडी तसेच ताल-वाद्याचा आवाज टिपेला पोहोचतो. एकदा सामन्याला सुरूवात झाली की, दोन्ही संघ परस्परांवर अक्षरश: तुटून पडतात. परस्परांवर मुक्त हस्ते रंग व रंगीत पाण्याची उधळण करतात. या सोहळ्यात थोडी थोडकी नव्हे तर एकाचवेळी पाच हजारहून अधिक नागरीक सहभागी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सामन्यात रंग उधळण्याची ही न्यारी तऱ्हा असताना दुसरीकडे येवलेकर देव-देवतांसोबतही रंगपंचमीचा आनंद लुटतात. यासाठी खास चंदन आणि केशरचा वापर करून रंग तयार करण्यात येतो. येथील बालाजी मंदिरात होळी ते रंगपंचमी या कालावधीत खास उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या समारोप रंगाची उधळणीने केला जातो. पैठणी व पतंगांसाठी प्रसिध्द असणाऱ्या येवल्यातील रंग पंचमीचा बाजही काही वेगळा आहे. शिवजयंती आणि पाठोपाठ येणाऱ्या रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर, आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही दक्ष झाली आहे.

Story img Loader