परभणी जिल्ह्यात लवकरच सरपंच परिषद व योजना उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंचांना परिषदेस निमंत्रित करून ग्रामविकासाच्या योजनांची माहिती देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री खान यांनी पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, परभणी महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर, त्रिधारा शुगर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तहसिन अहमद खान, अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही. निला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. सी. कुडमुलवार, अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. जारोंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. एच. सिद्दीकी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले आदी उपस्थित होते.
परिषदेनिमित्त विविध विभागांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात येतील. तज्ज्ञ मार्गदर्शकांची विविध योजनांवर माहितीपूर्ण व्याख्याने घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. कृषी विद्यापीठाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. परिषदेत आरोग्य, शिक्षण, महिला-बालकल्याण, कृषी, समाजकल्याण, पशुसंवर्धन, सिंचन, महिला आर्थिक विकास महामंडळ,  विविध महामंडळे, पोलीस अशा विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल्स उभारण्यात येतील. िपगळगड नाल्याबाबत कृषी, तसेच जलसंधारण खात्याच्या मंत्र्यांकडे लवकरच बैठक घेण्यात येणार असून मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषि विभागाचे अधिकाऱ्यांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील भूजलपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याबद्दल मंत्री खान यांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात जलसंधारणाची कामे योग्य पद्धतीने न झाल्यास स्थिती आणखी खालावेल, असा इशारा देताना जिल्ह्यातील कृषी विभागांतर्गत, तसेच इतर जलसंधारण कामाची पाहणी व तपासणी करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या कामातील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yojna utsav from parbhani sarpanch parishad
Show comments