शाळाबाह्य़ मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, त्यात यश आले तरच राज्य सरकारने ‘लेक वाचवा’ हे अभियान राबवले ते पुर्ण होईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी चांदे येथे बोलताना केले.
राज्य सरकारच्या लेक वाचवा अभियानाची राज्याची सांगता कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रक येथे न्यू इंग्लीश स्कूलमध्ये झाली. यावेळी माने बोलत होते. ज्येष्ठ नेते बापुसाहेब गुंड, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, परमवीर पांडूळे, राजेद्र गुंड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिलीप गोंविद, अरूण धामणे (माध्यमिक) आदी यावेळी उपस्थित होते.
माने म्हणाले, आजही कामगार, गरीब शेतकरी, शेतमजूर, यांच्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. कर्जत तालुका दुष्काळी असला तरी मुलींच्या शिक्षणासाठी राबवलेले उपक्रम चांगले आहेत. येथील मुलींची प्रगती समाधानकारक आहे असे कौतुक करतानाच आरटीई व बालहक्क कायद्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
अनिल भंडारी यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलला ई-लर्निग प्रकल्प विद्यार्थ्यांंना लोकार्पण करण्यात आला. बारडगांव दगडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांंनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला.

Story img Loader