बाहेरून कुलूप लावलेल्या एका खोलीत तरुणीचा अत्यंत कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने जाटतरोडी भागात बुधवारी सकाळी खळबळ उडाली. तिच्या खुनाप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पूजा हनुमंत यादव हे खून झालेल्या तरुणीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जाटतरोडीत रेल्वे मार्गाला लागूनच एका खोलीत ती गेल्या काही महिन्यांपासून एका तरुणासोबत रहात होती. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्या परिसरात अत्यंत दरुगध सुटल्याने नागरिक हैराण झाले होते. नागरिकांनी शोध सुरू केला. पूजा रहात असलेल्या खोलीतून दरुगध येत असल्याचे नागरिकांना जाणवले. तेथे बघ्यांची गर्दी झाली. कुणीतरी पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा, अजनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद नेर्लेकर यांच्यासह इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खोलीच्या दाराचे कुलूप तोडून दार उघडले असता कुजलेल्या दरुगधाचा दर्प बाहेर आला. बराचवेळ कुणालाच खोलीत शिरकाव करता आला नाही.
काहीवेळानंतर पोलीस आत गेले तेव्हा आतील खोलीत एका तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला. मृतदेहावर कपडे झाकले होते. तिच्या मानेखाली सांडलेले रक्त वाळले होते. तिच्या गळ्यावर धारदार पात्याने कापल्याच्या जखमा होत्या व त्यातून निघणारे रक्तही वाळले होते. त्यावर माशा घोंगावत होत्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला. पूजाचा खून कुणी व कशासाठी केला असावा, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही पावलांवर तिची बहीण व जावई रहातात. त्यांनीही याबाबत काही सांगण्यास अनभिज्ञता दर्शविली.
सतरा वर्षांची पूजा मुंबईत लहानाची मोठी झाली. तेथून ती नागपूरला काही महिन्यांपूर्वी आली होती. मुंबईहून आलेल्या एका तरुणासोबत ती रहात होती. दोघेही मिळेल ते काम करीत होते. त्या दोघांचे लग्न झाल्याचे तिने लोकांना सांगितले होते. प्रत्यक्ष खोलीत पोलिसांना त्यासंबंधी काहीच आढळले नाही. चार-पाच दिवसांपासून तिच्या खोलीला कुलूप होते आणि ते दोघेही दिसत नव्हते. अनेकदा ते दोघे मुंबईला जात असल्यामुळे आताही ते गेले असतील, असेच परिसरात राहणाऱ्या लोकांना वाटले. जवळच राहणाऱ्या बहिणीलाही ती सांगत नव्हती. त्यामुळे त्यांनाही काही शंका आली नाही. आज तिचा मृतदेह आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली. तिच्यासोबत राहणारा तरुणही बेपत्ता असल्याने त्याचा संशय वाढला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
पूजासोबत राहणाऱ्या तरुणाला मद्याचा शौक होता. त्यावरून त्यांची भांडणे होत होती. त्याच्या सोबत दोन-तीन जणांचे इतक्यात येणे-जाणे वाढले होते तसेच दोन दिवसांपूर्वी पूजाच्या जावयाच्या मोबाईलवर कुणीतरी संपर्क साधून पूजाच्या नवऱ्याचा ठावठिकाणा विचारला, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या बाबी शंकास्पद ठरल्या असून अनैतिक संबंध अथवा अत्याचार तर नाही ना, आदी शंका निर्माण झाल्या आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा दिवसभर इमामवाडा पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ते पोलिसांना तपासकामी दिशानिर्देश देत होते. त्याआधारे पोलिसांनी दोन-तीनजणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.

Story img Loader