आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या सक्षमीकरणासाठी सिडकोने सुरू केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला पहिल्याच दिवशी मंगळवारी ७० उमेदवारांनी नोंदणी करून प्रतिसाद दिला आहे. त्यात ६६ तरुणी आहेत.
सिडको आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या संयुक्त  सर्वेक्षणानुसार १० गावांमधील साडेतीन हजार तरुण-तरुणी या व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. खांदा कॉलनी येथील शंकर मंदिराशेजारील सिडकोच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात ही अर्ज नोंदणी सुरू आहे. मंगळवारी आलेल्या ७० पैकी ६६ महिलांनी ड्रेस मेकिंग तसेच ब्युटिपार्लरचे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज भरले. तसेच ४ तरुणांनी  छायाचित्रकार प्रशिक्षणासाठी अर्ज भरले. साडेबारा टक्के जमिनी वेळेत बहाल न केल्यामुळे सिडकोच्या विश्वासार्हतेबद्दल प्रकल्पग्रस्तांमध्ये संशय आहे. तो विश्वास संपादन करण्याच्या हेतूने सिडको प्रशासनाने प्रशिक्षणाची क्लृप्ती वापरल्याचे सांगण्यात येते.
या योजनेतही सिडको नोकरी देणार असा स्थानिकांचा सुरुवातीला समज झाला होता. मात्र त्यानंतर सिडको फक्त प्रशिक्षण देणार असल्याने सिडकोच्या या योजनेला हवा तसा प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांनी दिला नाही. सध्या या प्रकल्पाचे अभियंता सी. के. पाटील प्रकल्पातील गावांना भेटी देऊन तरुणांना येथे येऊन प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करत आहेत.
सिडको येथे तरुणांना पॅटर्न मेकिंग अ‍ॅण्ड गारमेट कन्स्ट्रक्शन, ड्रेस मेकिंग, फोटोग्राफी, कस्टमर रिलेशनशिप, स्वयंरोजगार, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, किराण दुकानदारांसाठी कौशल्यविकास, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग प्रोबेशनरी ऑफिसर, पोस्ट ग्रॅज्युएट डिपोल्मा इन बँकिंग ऑफिसर, सर्टिफिकेट कोर्स इन रिटेल बँकिंग सेल्स मॅनेजमेंट- सेल्स ऑफिसर, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड होम अप्लायन्स रिपेअर्स, फ्रीज, एसी दुरुस्ती, पंप मोटार दुरुस्ती या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षणक्षेत्रात या कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाच हजार ते साडेचार लाख खर्च आहे. प्रकल्पबाधित तरुणांकडून सिडको काही तुटपुंजी रक्कम डिपॉझीट ठेवून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थीना ते डिपॉझीटची रक्कम परत मिळणार आहे.

Story img Loader