संपूर्ण भारतात कार्तिकी यात्राही मुख्यत्वे घोडय़ांच्या अन् जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असून गेल्या दीडशे वर्षांच्या परंपरेला शोभेल असा खंडित झालेला घोडय़ांचा बाजार जोरात भरू लागला असून, घोडय़ांच्या बाजारात विक्रीस आलेल्यांपैकी उमदा घोडा एक लाख रुपयाला विकला गेला. बाजारात सुमारे २०० घोडे विक्रीस आले आहेत.
कार्तिकी यात्रेचा सोहळा चार दिवसांवर आला असून, यात्रेसाठी पंढरीनगरी सज्ज झाली आहे. मध्यंतरी जनावरांच्या बाजारात घोडे व्यापारी, दलाल, जनावरे घेऊन येणाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गावगुंडांकडून मारहाण करणे, धमकावून पैसे काढून घेण्याच्या घटना घडत. यामुळे हा घोडे बाजार अकलूज येथे भरू लागला होता.
बाजार समितीचे अध्यक्ष भगवान चौगुले, उपाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, संचालक मंडळ तसेच उमेश परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी चर्चा करून जनावरांच्या बाजारात सुरक्षाव्यवस्था, पोलीस बंदोबस्त, व्यापाऱ्यांना संरक्षण यावर भर देऊन व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याने जनावरांच्या बाजारात घोडे येण्यास तसेच गाई, बैल, म्हशी, रेडे, वळू, शेळय़ा आदी जनावरे दाखल होत आहेत.
घोडे बाजारात उमदे घोडे, शर्यतीमधील घोडे तसेच नुकरा, अबलक, पंचकल्याणी असे घोडे उत्तर प्रदेश, काठेवाडी, दिल्ली येथून आले आहेत. घोडे बाजारास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच बाजारात घोडय़ासाठीचे खोगीर, रेन, अंधारी, छातीपट्टा आदी वस्तू विक्रीस आल्या आहेत. घोडे घेऊन येणाऱ्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी घोडय़ांच्या सौंदर्य स्पर्धा, घोडे नृत्य स्पर्धा आदी आयोजित करण्यात आल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या घोडे बाजाराचे उद्घाटन सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महाअध्यक्ष सुधाकर परिचारक असून, प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती पुष्पा जाधव, पांडुरंग सह. अध्यक्ष दिनकर मोरे आदी आहेत.
घोडे बाजार मुख्य कार्तिकीचे आकर्षण असून येथे येणारा हौसी तसेच घोडे खरेदी करणारे हे देवाच्या दारातील घोडे घेण्यास धन्यता मानतात. यातील घोडे दिंडीत, पालखी सोहळय़ात सहभागी केले जातात. त्यामुळे पंढरीच्या घोडे बाजाराला विशेष महत्त्व असल्याने काही काळासाठी खंडित झालेला हा बाजार पुन्हा एकदा जोमाने चालू करण्याचा चंग कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा