श्रीनगर येथे घुसखोर अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील कागल तालुक्यातील जवान सात्ताप्पा महादेव पाटील हे शहीद झाले. अतिरेक्यांशी सामना करताना गुरुवारी त्यांना गोळी लागली होती. श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे बेलेवाडी (ता.कागल) गावावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, दोन बहिणी आणि वीरपत्नी अश्विनी असा परिवार आहे. कागल तालुक्यातीलच कुंडलिक माने हे ऑगस्ट महिन्यामध्ये पुँछ येथे झालेल्या पाकिस्तानी सैन्यांच्या गोळीबारामध्ये शहीद झाले होते.    
कागल तालुक्यातील बेलेवाडी (सेनापती कापशी) येथील सात्ताप्पा पाटील हे भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगरमध्ये १५ आर.आर.येथे कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांची घुसखोर अतिरेक्यांशी चकमक उडाली. गोळी लागून जखमी झालेल्या पाटील यांच्यावर सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.    गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये ते गावी येऊन गेले होते. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त समजताच समस्त गाव शोकाकुल झाले. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राजाराम माने, तहसीलदार शांताराम सांगडे यांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सांत्वनपर पत्र पाठवले होते. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिक बेलेवाडी गावी आणण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.