श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील एका तरूण अभियंत्याचा डेंगीच्या साथीने मृत्यू झाला. तो दि. ३ पासून तापाने आजारी होता. तालुक्यात या साथीचा हा चौथा बळी असून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोळगाव येथील दरेवस्ती येथे राहणारे कोंडिबा दत्तात्रय शिंदे (वय २२) हे नाशिक येथे एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. नाशिक येथे असतानाच दि. ३ जानेवारीला ताप आल्याने ते आजारी पडले. गावी कोळगाव येथे आल्यानंतर दि. ५ला त्यांनी तेथील डॉ. साके यांच्याकडे उपचार घेतले. परंतु ताप कमी न झाल्याने दि. ६ला त्यांना नगर येथील स्वास्थ रूग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवस तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु अखेर दि. ८ जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता शिंदे यांचा मृत्यू झाला.
या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. श्रीगोंदे तालुक्यात डेंगी व स्वाईन फ्ल्यू या साथीच्या आजारांनी यापूर्वी तीनजणांचे बळी घेतले आहेत. जिल्हा हिवताप तज्ञ व तालुका आरोग्य अधिकारी, कोळगाव येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने त्या वस्तीवर जाऊन पाहणी केली आहे. पालकमंत्र्यांचा तालुका असूनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे येथे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आज तालुक्यात होती.