मंगळवार दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपले आप्त, मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासून तरूण, तरूणी फडके रोडवर जमले होते. तरूणाईच्या जल्लोषात बालगोपाळ, ज्येष्ठ, वृध्द मंडळीही सहभागी झाली होती. नाटय़, नृत्य कलाविष्कारांचा स्वाद घेत, उभ्या उभ्याच फराळावर ताव मारत तरूणाईने युवा भक्ती दिन मोठय़ा जल्लोषात साजरा केला.
गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर जमण्याची परंपरा आहे. जुन्या जाणत्यांनी सुरू केली ही परंपरा आजही सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावच्या वेशीवर असलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जुनी जाणती मंडळी जमत असत. तीच परंपरा पुढे सुरू राहिली आणि बघता बघता फडके रोडवर दिवाळीच्या दिवशी तरूणाई फुलू लागली. विविध पेहरावात आपल्या मित्र, स्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासून तरूण, तरूणी उपस्थित होते. यावेळी सुयश नाटय़ संस्था, श्री मुद्रा कलानिकेतन या संस्थांच्या नाटय़, नृत्य कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले.
गणपती मंदिराच्या आवारात एक भव्य पणती कलाज्योत या नावाने तयार करण्यात आली होती. मुंबईतील रचना संसदच्या केतकी शिंत्रे, अनिकेत पोतदार, संकेत, जुही शहा, शिप्रा, सौरभ यांनी ही पणती तयार करण्यात पुढाकार घेतला होता. ही पणती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गणेश मंदिर दर्शनासाठी गर्दीने फुलून गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा