जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) नाव नोंदविण्याबद्दल अनास्था वाढतच असून रोजगाराची नसलेली शाश्वती, हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी या केंद्राचे महत्त्व कमी झालेले नसून आजही खाजगी क्षेत्रात या केंद्रात नोंदणी केलेल्यांना प्राधान्य मिळत असल्याचा दावा केंद्रातर्फे केला जातो.
सात-आठ वर्षांपूर्वी पाल्य दहावी उत्तीर्ण असो वा नसो त्याची जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केली जायची. त्यानंतर पदवीधर झाल्यावरही तशी नोंदणी केली जायची. नोकरी देताना या कार्यालयातून नावे मागितली जात असल्याने तसेच नोकरी मिळेल, या आशेने नोंदणी करण्याचा कटाक्ष होता. पालकही त्याबाबत आग्रही असायचे. आता हा कल कमी झालेला आहे. बहुतांश विद्यार्थी अशी नोंदणीच करीत नाहीत. पालकही त्याकडे कानाडोळा करतात. परिणामी नोंदणी करून कार्ड मिळविणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. नाव नोंदविण्याची अनास्था निर्माण होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात.
नागपूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात ३१ डिसेंबर २००९ रोजी १ लाख ६५ हजार ७२६ एवढा नोंदणीचा आकडा होता. १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत एकूण ७१६९० एवढी बेरोजगारांची नोंदणी झाली. ३१ मार्च २०१३ पर्यंत १ लाख २७ हजार ३० एवढी नोंदणी संख्या होती. फक्त ३१ मार्च २०१३ या एका दिवशी केवळ २२ बेरोजगारांनी नोंदणी केली. २००९ ते २०१३ या कालावधीत एकूण १५९०४ उमेदवारांना स्थाई/अस्थाई स्वरुपात रोजगार मिळाला असून त्यात १३०३३ पुरुष, २८७१ महिला, २ मूकबधिर तसेच ११ अस्थिव्यंगांचा समावेश होता. केंद्र शासनात २६७, राज्य शासनात ४५७७, केंद्रीय निमशासकीय कार्यालयात २६५, राज्य निमशासकीय कार्यालयत १६३७, स्थानिक स्वराज्य संस्था ३४४, खाजगी ८८१४ उमेदवारांना रोजगार मिळाला.  माहिती अधिकारांतर्गत अभय कोलारकर यांनी नागपूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडून ही आकडेवारी मिळवली आहे. गेल्या सात वर्षांत सरासरी नोंदणी करणाऱ्यांची संख्या सरासरी ३० हजार आहे. ही आकडेवारी पाहता नोंदणी करण्याबाबत अनास्था वाढत असल्याचे तसेच रोजगाराची संख्याही कमी झाल्याचे स्पष्ट होते. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राचे सहायक संचालक ज्ञा. मा. गोस्वामी यांनी रोजगार नोंदणीची संख्या झाल्याची कबुली दिली. केवळ नोंदणीच्या आधारे नोकरी देण्याचा आग्रह करता येणार नसून स्वतंत्र जाहिराती देऊन उमेदवारांची निवड करावी, असा आदेश निघाल्याने रोजगार मिळण्याची तसेच नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी या केंद्राचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. ओ अँड जी. सी. सारख्या नावाजलेल्या कंपन्यांसह अनेक क्षेत्रात पद भरती करताना महाराष्ट्रातील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातील नोंदणी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे येथे नोंदणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आता या संपूर्ण कार्यालयाचे संगणकीकरण झाले असून नोंदणी ऑनलाईन झाली. घरबसल्या नोंदणी करता येऊ शकते. याशिवाय प्रत्येक गावात,आयटीआय तसेच सेतू कार्यालयातूनही नोंदणी करता येते. खाजगी क्षेत्रातून आयटीआय त्याचप्रमाणे कुशल उमेदवारांची मागणी जास्त आहे. नुसते पदवीधर असून कामाचे नाही, त्यास कुशल अथवा तांत्रिक अभ्यासक्रमाची जोड असणे गरजेचे आहे. या विभागाचे स्वतंत्र पोर्टल तयार होत असून उद्योजक त्यावरील यादीतून स्वत:च उमेदवारांची उमेदवारांची निवड करू शकतील, असेही गोस्वामी यांनी सांगितले.

Story img Loader