युवक काँग्रेसचे पदाधिकारी व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह शहरातल्या पंदे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात धुडगूस घालून एका प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण केली. दुपारी घडलेल्या या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. पण काही वेळानंतर या प्रकारावर पडदा टाकण्यात आला.
शहरातल्या चैतन्यनगर परिसरात पंदे कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आहे. कंपनीकडे शहराच्या वेगवेगळय़ा भागातील बीएसयूपीअंतर्गत घरकुलांची व अन्य कामे आहेत. काँग्रेस नेत्यांची विशेषत: महापालिकेतील सत्ताधाऱ्याची मेहेरनजर असलेल्या पंदे कन्स्ट्रक्शन कंपनीत दुपारी राडा झाला. दुपारी दीडच्या सुमारास साळुंके व त्यांचे सहकारी कार्यालयात गेले. तेथे त्यांनी खुच्र्या फेकल्या. प्रकल्प अधिकारी प्रभाकर रेड्डी यांना मारहाण केली. हा वाद कशामुळे झाला, साळुंके तेथे कशासाठी गेले होते? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. मारहाणीनंतर साळुंके भाग्यनगर पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांनी तक्रार नोंदवली. त्यानंतर अध्र्या तासाने जखमी अवस्थेत प्रभाकर रेड्डी तेथे आले. त्यांनीही साळुंके यांच्याविरुद्ध तक्रार दिली. रेड्डी यांना मार असल्यामुळे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर एरवी सतर्कतेने कारवाई करणाऱ्या भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले नाही. दोन्ही बाजूंकडून मध्यस्थी झाल्यानंतर हे प्रकरण परस्पर मिटले. तांत्रिक कारण सांगत पोलिसांनीही या प्रकरणात हात वर करण्यातच धन्यता मानली.
दरम्यान, साळुंके यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या मालकीचे ट्रॅक्टर संबंधित कंपनीकडे भाडय़ाने आहे. तीन महिन्यांचे बिल थकीत होते. सकाळी कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्या लहान भावाशी उद्धट वर्तणूक केली. त्यामुळे दुपारी मी तेथे गेलो. सौहार्दपूर्ण चर्चेनंतर त्यांनी माझे २४ हजार १२२ रुपयांचे थकीत बिल धनादेशाद्वारे दिले.
युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याची प्रकल्प अधिकाऱ्यास मारहाण
युवक काँग्रेसचे पदाधिकारी व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अध्यक्ष केदार पाटील साळुंके यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह शहरातल्या पंदे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात धुडगूस घालून एका प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण केली. दुपारी घडलेल्या या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या.
First published on: 11-09-2012 at 09:26 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth congress member nanded loksabha construction company