विद्यार्थ्यांना आपली शाळा आणि देश कदापि न विसरण्याचा सल्ला देतानाच साधारणपणे १९९०-९१ नंतर जागतिकीकरणातंर्गत बदललेल्या अर्थव्यवस्थेत तरुणांना कारकीर्द करण्याची उत्तम संधी असल्याचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी नमूद केले.
स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांनी १९३१ मध्ये येथे स्थापन केलेल्या स्वराज्य आश्रमाचे रुपांतर १९३८ मध्ये जनता शिक्षण मंडळ या संस्थेत झाले. या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षांरंभ कार्यक्रमात डॉ. काकोडकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. शिरीष चौधरी हे होते. अमृत महोत्सवी वर्षांरंभ आणि धनाजी नाना विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत हे उपस्थित होते. काकोडकर यांनी संस्थेच्या जडणघडणीत तसेच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या विकासात मधुकरराव चौधरी यांचा सिंहाचा वाटा होता असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या सर्व आजी-माजी कार्यकारी सदस्यांचा डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्तविकात मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांनी मधुकरराव चौधरी यांनी सुरू केलेल्या ‘झेप उत्कृष्टतेकडे’ या उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन विषयक विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
डॉ. सावंत यांनी महाराष्ट्रातील शिक्षणाचे खरे शिल्पकार हे मधुकरराव चौधरी हेच होते असे नमूद केले. शिरीष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण द्यावे, चांगल्या दर्जाचे समाजघटक निर्माण करावेत हेच या संस्थेचे कार्य राहिले आहे असे सांगितले. सूत्रसंचालन प्रतिभा बोरोले, मनिषा चौधरी यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष पी. डी. महाजन यांनी मानले.

Story img Loader