येथील गणेश वाचनालय संचालित ‘आलाप’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘स्वरोन्मेष’ या युवक संगीत संमेलनात शर्वरी नागवेकर यांचे गायन व सतारवादक स्वीकार कट्टी यांच्या ध्रुपद व धमार या गायकीला रसिकांनी चांगली दाद दिली.
रघुत्तमराव राजूरकर व रामकृष्ण राजूरकर यांच्या स्मृत्यर्थ आयोजित संमेलनाचे उद्घाटन वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाची सुरूवात गोव्याच्या कु. शर्वरी नागवेकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीला ‘नटभरव’ हा राग सादर केला. ‘गुंज रही किर्ती तुम्हारी’ व ‘सुरज चंदा जबतक फिरे’ या बंदिशी अप्रतिमपणे सादर केल्या. त्यानंतर त्यांनी राग जौनपुरी सादर केला. ‘हे सुरानो चंद्र व्हा’ या नाटय़गीताने कु. नागवेकर यांच्या गायनाचा समारोप झाला.
सतारवादक कट्टी यांच्या राग ‘बसंत मुखारी’ने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आली. मुंबईच्या साहिली तळवलकर यांनी राग ‘अहिरभरव’ सादर केला. ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाने गायनाची सांगता झाली. तबलावादक स्वप्नील भिसे यांनी तिन्ही कलावंतांना साथ केली. कृष्णराज लव्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात तबलावादक यशवंत वैष्णव यांचा कार्यक्रम झाला. तसेच पुण्याचे रमाकांत गायकवाड यांचे गायन झाले. या दोघांना मिलिंद कुलकर्णी यांनी साथ केली. डॉ. यशवंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ‘आलाप’ च्या वतीने पंकज लाटकर यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा