राजकीय पक्षात काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांची वैचारिक बैठकही चांगली असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ‘युवक कार्यकर्ते व पत्रकार मुक्तसंवाद’ या विषयावर बुधवारी येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. चर्चासत्रात माजी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, ‘यशदा’चे राजीव साबडे, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी भाग घेतला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, तसेच रवी चौधरी, संदीप बालवडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
राजकीय पक्षात काम करणाऱ्या युवकांची वैचारिक बैठक चांगली असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच्या जबाबदाऱ्या ओळखून पक्षातील युवकांनी काम करावे, असे आवाहन मलिक यांनी यावेळी केले. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र कसा घडवला या विषयावर कुलकर्णी यांनी सविस्तर विवेचन केले. पक्षाचे काम करताना जनसामान्यांविषयीची संवेदनशीलता कधीही हरवू देऊ नका, असेही आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. साबडे यांनी माध्यमांचा इतिहास आणि बदलते स्वरूप याविषयीची माहिती दिली. बातमी चांगली व योग्य असेल, जनहिताची असेल, तर अशा बातमीच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करावा लागत नाही. फक्त कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे, असे करंदीकर म्हणाले. काकडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. राजकीय पक्षातील युवा कार्यकर्त्यांनी चौफेर वाचनावर भर देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader